अवघ्या २0 मिनिटांत शिकस्त इमारत जमीनदोस्त
By admin | Published: June 11, 2016 02:56 AM2016-06-11T02:56:17+5:302016-06-11T02:56:17+5:30
अकोला मनपाची किराणा बाजारात कारवाई
अकोला: महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे पाहून आयुक्त अजय लहाने यांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. टिळक रोडवरील किराणा बाजारातील अत्यंत जीर्ण झालेली इमारत शुक्रवारी अवघ्या २0 मिनिटांत महापालिकेच्या कर्मचार्यांनी धाराशायी केली. पावसाळ्य़ात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते; मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. मनपादप्तरी असलेली इमारतींची संख्या पाहता, जीर्ण इमारतींचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्यांना दिले. आयुक्तांच्या निर्देशाला २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच उत्तर झोन अंतर्गत येणार्या टिळक रोडवरील किराणा बाजार परिसरातील मालमत्ताधारक विमलराणी खत्री यांची शिकस्त इमारत धाराशायी करण्याची कार्यवाही करण्यात आली. उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभाग व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.