पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात मजुरांचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 06:12 PM2020-05-16T18:12:04+5:302020-05-16T18:12:14+5:30
गत काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने मजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत.
अकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना देशभरातील इतर शहरांमध्ये अडकून पडावे लागले. त्यामध्ये शिथिलता आल्याने गत काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने मजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून त्या प्रवाशांची तपासणी केली जात असून, त्यांना गावातच अलगीकरणात ठेवले जात आहे. १६ मे रोजी जिल्ह्यात १,३९४ प्रवासी दाखल झाले आहेत. त्यापैकी तीन प्रवाशांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या २९,०४२ झाली असून, २६१
जणांवर पुढील उपचार करण्यात आले. २४,४९६ जणांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनच्या काळातही जिल्ह्यात प्रवाशांचा ओघ सुरूच होता. आता इतरत्र अडकलेल्या सर्वांनाच आपल्या मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी वाहनांची सोय तसेच परवानगी मिळाली. त्यामुळे देशभरातून प्रवाशांचा ओघ वाढला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
ऐन प्रसाराचा वेग वाढण्याच्या काळात प्रवासी येत असल्याने कोरोना प्रसाराचा धोका दैनंदिन वाढतच आहे. आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २६१ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या १६ मेपर्यंत २९,०४२ आहे. त्यापैकी २४,४९६ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी समाप्त झाला आहे. आता ४,२६० प्रवाशी ‘क्वारंटीन’ आहेत. ‘क्वारंटीन’ केलेल्या प्रवाशांची संख्याही दैनंदिन वाढतीच आहे. त्यामुळे त्यांचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत कोरोना प्रसाराच्या धोका कायम आहे.
१६ मे रोजी दाखल झालेले प्रवासी
प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा-२९, पळसो-२१, कुरणखेड-२१, कापशी-२९,
आगर-२९, दहीहांडा-१४, कावसा-३६, मुंडगाव-२५, सावरा-२६, पारस-३०,
उरळ-९०, हातरूण-२९, वाडेगाव-२५, धाबा-१३०, कान्हेरी सरप-६९, महान-७७,
पिंजर-१४६, पातूर-१११, बाभूळगाव-४६, आलेगाव-४०, मळसूर-१३, सस्ती-२४,
अडगाव-३३, पंचगव्हाण-३२, हिवरखेड-२, दानापूर-११, कुरूम-३७, धोत्रा-६७, पारद-६७, जामठी-८५ प्रवासी दाखल झाले आहेत.