अकोला रेल्वेस्थानकावरील ‘एफओबी’चे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:36 PM2019-11-22T12:36:05+5:302019-11-22T12:36:20+5:30
कंत्राटदारास दिलेला अवधी पूर्ण झालेला असतानाही कामाची गती वाढलेली नाही.
अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर गत दोन वर्षांपासून एफओबीचे काम संथ गतीने सुरू असल्याने अकोलेकर प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अकोला रेल्वेस्थानकावर दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची गर्दी सावरण्यासाठी आणि प्रवाशांना सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अकोला रेल्वेस्थानकावर फूट ओव्हर ब्रीज उभारणीला मंजुरी दिली. कोट्यवधीचा निधी यासाठी मंजूर झाला. गत दोन वर्षांपासून या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. नागफणी रेल्वे वसाहतीजवळून निघणारा हा एफओबी अकोला रेल्वेस्थानकाच्या सर्व प्लॅटफार्मला जोडलेला राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्लॅटफार्मवरूनची वाहतूक सोयीस्कर होणार आहे. अकोलेकरांसाठी हा एफओबी महत्त्वाचा ठरणार आहे; मात्र सदर काम संथ गतीने होत असल्याने पाचही प्लॅटफार्मवर तोडफोड सुरू आहे. प्लॅटफार्मवरील फरशी यासाठी उकलली गेली असून सिमेंटचे आणि लोखंडी रॅम्प उभारून ठेवले आहे. त्यामुळे अडसर निर्माण झाला आहे. कंत्राटदारास दिलेला अवधी पूर्ण झालेला असतानाही कामाची गती वाढलेली नाही. भुसावळ डीआरएम यांनीदेखील संथगतीने होत असलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या पुढाकाराची गरज
अकोला रेल्वेस्थानकावरील एफओबीच नव्हे तर इतरही विकास कामांची गती धिमी झाली आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे केंद्रीय राज्यमंत्री झाल्यापासून झेडआरयूसीसी पदाधिकारी आणि डीआरएमच्या बैठकी व दौऱ्यांमध्ये नाहीत. त्याचा परिणाम विकास कामांवर जाणवत आहे. रेंगाळत असलेल्या विकास कामांचा आढावा केंद्रीय मंत्री धोत्रेंकडून होण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया अकोलेकर व्यक्त करीत आहेत.