आखाडे ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू
By admin | Published: September 28, 2015 02:23 AM2015-09-28T02:23:59+5:302015-09-28T02:23:59+5:30
शिवशक्ती प्रतिष्ठानचा समावेश : तब्बल हजारावर मुलांनी केली चित्तथरारक प्रात्यक्षिके.
अकोला - सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये एकूण २८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व ४ आखाडे सहभागी झाले असून, यामध्ये कौलखेडमधील शिवशक्ती प्रतिष्ठानचा आखाडा व वीर भगतसिंह गणेशोत्सव मंडळ या मिरवणुकीत आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या मार्गदर्शनात असलेल्या या आखाड्यातील तब्बल हजारावर मुलांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून भाविकांची मने जिंकली. कौलखेड येथील शिवशक्ती प्रतिष्ठानचा आखाडा सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सहभागी होत असून, या आखाड्यातील हजारो मुले विविध प्रकारचे प्रात्यक्षिक व मलखांबावरील विविध प्रकार सादर करतात. यावर्षीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवशक्ती प्रतिष्ठानच्या मुलांनी लेजीम, कराटे, नॉनचॉप, भवरा यासह विविध प्रकारची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये ६५0 मुलांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिक सादर केली असून, १00 मुलांनी कराटेचे विविध प्रकार सादर केले. सार्वजनिक गणेशात्सव मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या मार्गदर्शनात काढलेल्या या आखाड्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत रंगत आली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे, नगरसेवक पंकज गावंडे, युवराज गावंडे यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.