चित्रपटांमध्ये समाज प्रबोधनापेक्षा व्यावसायिकतेवर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:56 AM2017-10-13T01:56:07+5:302017-10-13T01:57:03+5:30

एकेकाळी चित्रपट हे समाज प्रबोधन, संस्कृती, कलेवर भर देणारे असत. सध्या चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. चित्रपटांमधून समाज प्रबोधनापेक्षा आता व्यावसायिकतेवर भर दिला जात आहे. चित्रपट हे निव्वळ मनोरंजनाचे साधन बनू नये. 

Focus on filmmakers abijeet deshpande | चित्रपटांमध्ये समाज प्रबोधनापेक्षा व्यावसायिकतेवर भर!

चित्रपटांमध्ये समाज प्रबोधनापेक्षा व्यावसायिकतेवर भर!

Next
ठळक मुद्देप्रा. अभिजित देशपांडे यांचे मत बाबूजी देशमुख वाचनालय नवरात्र व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  एकेकाळी चित्रपट हे समाज प्रबोधन, संस्कृती, कलेवर भर देणारे असत. सध्या चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. चित्रपटांमधून समाज प्रबोधनापेक्षा आता व्यावसायिकतेवर भर दिला जात आहे. चित्रपट हे निव्वळ मनोरंजनाचे साधन बनू नये. 
त्यातून समाजहित, प्रबोधन, संदेशसुद्धा दिला पाहिजे. चित्रपट समजून घेताना, रसिकांनी त्यामागील अर्थकारण समजून घेत, साक्षर झालं पाहिजे आणि कोणता चित्रपट पाहावा आणि कोणता पाहू नये, हे सुद्धा ठरविले पाहिजे, असे मत प्रा. अभिजित देशपांडे (मुंबई) यांनी व्यक्त केले. 
बाबूजी देशमुख वाचनालयातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित नवरात्र व्याख्यानमालेत ते ‘चित्रपट समजून घेताना..’ विषयावर बोलत होते. गुरुवारी व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली. यावेळी विचारपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर, सचिव अनुराग मिश्र उपस्थित होते. 
प्रा. अभिजित देशपांडे यांनी, जगात निर्माण होणार्‍या अडीच हजार चित्रपटांपैकी भारतात दरवर्षी १२00 ते १५00 चित्रपट प्रदर्शित होतात. चीन, अमेरिकेपेक्षाही जास्त चित्रपट भारतात बनतात. माध्यमांनी समाज वेढलेला आहे. वेगाने प्रत्येक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. १८९६ पासून चित्रपट निर्मितीला प्रारंभ झाला. सुरुवातीला, त्यामध्ये समाज, प्रबोधन, गरिबी, दारिद्रय़ याला महत्त्व होते; परंतु आता चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन आहे. त्यातून मोठी अर्थप्राप्ती होत आहे. 
मनोरंजन आणि अर्थप्राप्तीतून चित्रपट निर्मिती होत आहे. त्यातून कोणतेही समाजहित जोपासले जात नाही. चित्रपट ही एक वैश्‍विक भाषा आहे; परंतु समाज, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, त्याला रसिक फार कमी आहेत. चित्रपट निर्मिती करताना, त्याला तंत्रज्ञानाचा, कॅमेर्‍याचा आधार लागतो. चित्रपट ही समूह कला आहे. असे सांगत, देशपांडे यांनी अलीकडच्या काळात चित्रपटांमध्ये भंपक, बीभत्स आणि खोट्या कल्पना अधिक मांडल्या जातात. 
श्रीमंती, अहंकाराचे प्रदर्शन करणारे सध्याचे चित्रपट आहेत. खूपच कमी चित्रपट समाज, देश, संस्कृती, कलेवर भर देतात. ग्रामीण जीवन, शेतकर्‍यांच्या समस्यांसह अनेक विषय चित्रपटातून हाताळता येतात; परंतु त्यातून पैसा मिळत नाही. त्यामुळे रसिकांनीसुद्धा चोखंदळ, साक्षर होऊन चित्रपट बघावे, असे आवाहनही त्यांनी केले. रसिकांची प्रगल्भता वाढली, तर त्यांच्या वैचारिक पातळीचे चित्रपट निर्माण होतील, अशी आशाही प्रा. देशपांडे यांनी व्यक्त केली. 

Web Title: Focus on filmmakers abijeet deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.