जैववायू (बायोगॅस) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:50 PM2018-10-13T13:50:33+5:302018-10-13T13:50:43+5:30
अकोला: अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणाऱ्या जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे ३० टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे.
अकोला: अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणाऱ्या जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे ३० टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे. गॅस सिलिंडर व रॉकेलला सक्षम पर्याय असलेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारावर या कृषी विद्यापीठाने भर दिला आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत विषयावर आयोजित दहा दिवसीय कार्यशाळेत निष्कर्ष काढण्यात आले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्यावतीने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागात दहा दिवसीय राष्टÑीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्रालयाद्वारे देशात जैववायू निर्मिती, राष्टÑीय प्रकल्प राबविण्यात येत असून, २००६ पर्यंत या प्रकल्पांतर्गत देशात ३८.३४ लाख कौटुंबिक वापराच्या जैववायू संयंत्राची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या जैववायू मॉडेल्सचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. कौटुंबिक पद्धतीने उभारलेल्या जैववायू संयंत्रामध्ये गायी, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांच्या शेणाचा वापर करण्यात येतो. या संयंत्राला पाण्याची गरज असते; परंतु उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने बहुतांश संयंत्र बंद पडले आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जैववायू संयंत्रामध्ये ओले शेण पाचन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने हे संयंत्र वर्षभर कार्यरत राहून जैववायू, विजेची गरज पूर्ण करण्याचे काम करीत आहे. या संयंत्राचे डिझाइन, मूल्यांकन, तंत्रज्ञान, कुशलता आदींचे यशस्वी परीक्षण या कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने केले आहे.
-अनुदान उपलब्ध
दोन घनमीटरचा बायोगॅस बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून आठ हजार रुपये अनुदान दिले जाते. या संयंत्राला शौचालय जोडले असल्यास एक हजार रुपये जास्त दिले जातात. आताच्या बांधकाम साहित्याच्या दरानुसार ३० हजारांपर्यंत दोन घनमीटरचे बायोगॅस संयंत्र उभारता येते.
-विकसित संयंत्र ३० टक्केपेक्षा जास्त बायोगॅस निर्माण करते. या संयंत्राचे सर्व प्रकारचे परीक्षण करण्यात आले आहे. पारंपरिक बायोगॅस संयंत्राला हा उत्तम पर्याय आहे. या विषयासह राष्टÑीय कार्यशाळेत अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पावर मंथन करण्यात आले.
- डॉ. सुरेंद्र काळबांडे,
संशोधन अभियंता,
अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग,
डॉ. पंदेकृवि, अकोला.
/>-----------------------------------------