जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदारांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:39+5:302021-04-07T04:18:39+5:30
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या व्यापारी, ...
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या व्यापारी, दुकानदार, दूध-भाजीपाला, फळ विक्रेते आणि औषध विक्रेत्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करून यासंदर्भात ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी (५ एप्रिल) जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था यासंदर्भात बैठकीत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील ज्या व्यक्ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. तसेच जे ४५ वर्षांच्या वयावरील आहेत, अशा लोकांचे लसीकरण करावे. त्यामध्ये जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील व्यापारी, दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, औषध विक्रेत्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. या लोकांचे घटकांचे लसीकरण करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची उत्पन्न गटनिहाय यादी तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात पाणंद रस्ते कामांची विशेष मोहीम राबवा!
शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते, बियाणे, अवजारे व यंत्रांची वाहतूक करणे सोपे व्हावे, यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून, जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात पाणंद रस्ते कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना देत या रस्ते कामांसाठी लागणारे खडी, मुरुम, आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारणाचे उपचार करण्याकरिता उपविभागीय अधिकारीस्तरावर बैठका घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यानी दिले.