राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यावर भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 02:11 PM2018-09-14T14:11:17+5:302018-09-14T14:11:41+5:30
अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येत आहे.
अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सर्वच अनुषंगाने दर्जा घसरल्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मानांकनात या कृषी विद्यापीठाचा क्रमांक ४८ वा आला होता. यात सुधारणा करण्यात आल्याने हा क्रमांक आता ४२ वर आला आहे. दरम्यान, यावर्षी आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ‘आयसीएआर’ची अधिस्वीकृती समिती आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे कृषी विद्यापीठांनी कामाची गती वाढविली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिस्वीकृती समितीने मागील तीन वर्षांपूर्वी राज्यातील कृषी विद्यापीठाचा आढावा घेतला होता. आढाव्यात कृषी विद्यापीठांचे शिक्षण, संशोधन व विस्तार काम समाधानकारक दिसले नव्हते, त्यामुळे ‘आयसीएआर’ने त्यावेळी कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली होती. त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. ही अधिस्वीकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाला करावे लागले.
२०१४ पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढली; पण कृषी विद्यापीठांची संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक आदी अर्ध्यांच्यावर पदे रिक्त होती. शासनाने पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यांचा ताण हा अपूर्ण मनुष्यबळावर पडल्याने कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांवर अतिरिक्त भार पडला होता. शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे त्यांना करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली, संशोधनावरही परिणाम झाले. ‘आयसीएआर’च्या अधिस्वीकृती समितीला हे सर्व त्यावेळी ठळकपणे दिसले. यामुळेच आयसीएआरच्या पहिल्या दहा क्रमांकात राहणारे अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे मानांकनात ४८ व्या क्रमांकावर पोहोचल्याचे समोर आले होते. आता यात थोडी सुधारणा झाली असून, हा क्रमांक ४२ वर आला आहे.
मनुष्यबळाचा प्रश्न हळूहळू सोडविला जात असून, कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षण, संशोधन व विस्ताराचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे दर्जा सुधारेल, सर्व सहकाऱ्यांच्या सहयोगाने मानांकनात पुढे जाण्याचे प्रयत्न सुरू आहे.
डॉ. व्ही. एम. भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.