धुक्यामुळे तुरीचे पीक धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:29 AM2020-12-05T04:29:38+5:302020-12-05T04:29:38+5:30
बाळापूर: सध्या तुरीचे पीक शेतात बहरलेले आहे; मात्र गत दोन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे धुके पडण्यास वाढ झाली आहे. पहाटेच्या ...
बाळापूर: सध्या तुरीचे पीक शेतात बहरलेले आहे; मात्र गत दोन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे धुके पडण्यास वाढ झाली आहे. पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे. धुक्यामुळे तुरीवर अळींचा प्रादुर्भाव व फुलगळ होत आहे. ती रोखण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे तालुक्यातील मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले उडीद, मुगाच्या पिकावर अज्ञात व्हायरसने आक्रमण केल्याने पिके हातची गेली. त्यानंतर सोयाबीनची परतीच्या पावसाने नासाडी झाली. तालुक्यात कपाशीवर जवळपास ८० टक्के बोंडअळीचे आक्रमण झाल्याने पिकाचे नुुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्याच्या आशा तुरीवर होत्या; मात्र गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी धुके पडत असल्याने तुरीची फुलगळ होत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. फुलगळती आणि अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. सध्या तूर फुलोऱ्यात असून, काही ठिकाणी तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीने हल्ला चढविला आहे. धुक्यामुळे जवळपास ३० ते ४० टक्के फुलगळ झाली असून, यंदा तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. (फोटो)
------------------------------
फवारणीला वेग; मजुरी महागली!
सध्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या व धुक्यामुळे फुलगळ होत असल्याने शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त असून, महागड्या औषधांची फवारणी करीत आहे. तसेच फवारणीची मजूरी १०० रुपयांनी वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
----------------------
यंदा खरीप हंगामात पिकांनी दगा दिल्याने संकट कायम आहे. तुरीवर आशा होती; मात्र धुक्यामुळे तुरीची फुलगळ होत असल्याने उत्पादनात घट होणार आहे.
- लक्ष्मण चोपडे, शेळद, ता.बाळापूर.