लोककलावंत विकताहेत वडे-भजे, गोळ्या बिस्किटे, भाजीपाला; सरकारी मदत तुटपूंजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:47+5:302021-08-14T04:23:47+5:30
अकोला : कोरोना काळात जनजागृतीचे कार्यक्रम बंद असल्याने, लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही लोककलावंत वडे, ...
अकोला : कोरोना काळात जनजागृतीचे कार्यक्रम बंद असल्याने, लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही लोककलावंत वडे, भजे, भाजीपाला, गोळ्या- बिस्किटे, कटलरी साहित्य विकण्याचे काम करीत असून, भंगार साहित्य विक्रीसह काही लोककलावंत शेतात मजुरीचे काम करीत आहेत. तर काहींनी बांधकाम व्यवसायात मजुरीचे तर काही कलावंत वीट भट्टीवर मजुरीचे काम करीत असून, काही कलावंत पाणीपुरी विकण्याच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सरकारने लोककलावंतासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली; मात्र ही मदत तुटपंजी ठरणार असल्याचा सूर लोककलावंतांमधून उमटत आहे.
सरकारची मदत कधी मिळणार?
लोककलावंतांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पात्र कलावंतांची कलावंतांची यादी संबंधित यंत्रणेकडून मागविण्यात आली आहे. यादी तयार झाल्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर लोककलावंतांसाठी मदतीची रक्कम पाठविली जाणार आहे.ही प्रक्रिया पूर्ण होण्यास आणि लोककलावंतांना प्रत्यक्ष मदतीचा लाभ मिळण्यास बराच कालावधी लागणार आहे.
जिल्ह्यात ५९१ लोककलावंत !
जिल्ह्यात अंगी विविध कला असलेले जवळपास ५९१ लोककलावंत आहेत. या कलावंतांची यादी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यांना पाच हजार रुपयांची मदत शासनाकडून मिळण्याची शक्यता आहे.
काय म्हणतात लोककलावंत ?
कोरोना काळात कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंतांवर उमपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोककलावंताना वडे, भज, भाजीपाला विकण्यासह विविध प्रकारचा व्यवसाय करावा लागत आहे. सरकारने लोककलावंतासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली; मात्र ही मदत अपुरी असून, किमान २५ हजार रुपयांची मदत देऊन सरकारने लोककलावंतांना दिलासा दिला पाहिजे.
प्रकाश अवचार
लोककलावंत तथा अध्यक्ष, प्रतिष्ठित लोककलावंत प्रतिष्ठान, अकोला.
कोरोनामुळे जनजागृतीचे कार्यक्रम बंद असून, वाढत्या वयामुळे दुसरे काम करता येत नाही. त्यामुळे उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने लोककलावंतांसाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत दिलासा देणारी असली तरी, ती उदरनिर्वाह करण्यासाठी अपुरी आहे.
शाहीर खंडूजी शिरसाट
लोककलावंत, अकोला.
कोरोना काळात जनजागृतीचे कार्यक्रम बंद असल्याने, गोळ्या-बिस्किटे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. सरकारने लोककलावंतांसाठी जाहीर केलेली मदत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पुरेशी ठरणारी नाही. मदतीच्या रकमेत वाढ केली पाहिजे.
संगीता ठोंबरे
लोककलावंत, बाळापूर.
..................फोटो.....................