टंचाई समस्येचा गावपातळीवर पाठपुरावा करा - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 03:29 PM2019-05-21T15:29:24+5:302019-05-21T15:31:53+5:30
जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले.
अकोला : जिल्ह्यातील टंचाईच्या समस्येशी लढणाऱ्या गावांमध्ये कोणत्या उपाययोजना झाल्या, कोणत्या करावयाच्या आहेत, यावर गावनिहाय माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले. उमरी येथील विद्यालयाच्या प्रांगणात ही बैठक दुपारी पार पडली.
बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, राजेंद्र पातोडे, ज्ञानेश्वर सुलताने, शोभा शेळके, हरिदास वाघोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील टंचाई समस्येची तीव्रता मांडण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य प्रत्येक गावात जाऊन माहिती घेणार आहेत. त्यांच्यासोबत पक्षाच्या पदाधिकाºयांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. गावनिहाय टंचाई आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांचा पाठपुरावाही ते करणार आहेत. त्याशिवाय, अॅड. आंबेडकर मुख्यमंत्र्यांकडे स्वत: या विषयावर उपाययोजनांची मागणी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी बैठकीत केले.
- निवडणुका येत राहतील..
लोकशाहीत निवडणुका येत राहतील. जय-पराजय होत राहतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाउमेद न होता पक्षाचे कार्य सातत्याने सुरूच ठेवावे, जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवावी, असा धीरही अॅड. आंबेडकर यांनी उपस्थितांना दिला. सर्वसामान्यांच्या समस्यांशी लढाई सुरूच ठेवा, असेही ते म्हणाले.