३० लाखांचा गुटखा तडकाफडकी जाळला; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:49 PM2019-03-01T13:49:36+5:302019-03-01T13:49:46+5:30
अकोला: पोलिसांनी केलेल्या कारवायातील गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी परिसरात नेऊन तडकाफडकी जाळला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पकडलेला गुटखा लगेच दुसऱ्या दिवशी जाळल्याची प्रथमच ही कारवाई साहायक आयुक्त लोभसिंह राठोड, निरीक्षक रावसाहेब वाकडे यांनी केली.
अकोला: पोलिसांनी केलेल्या कारवायातील गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी परिसरात नेऊन तडकाफडकी जाळला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पकडलेला गुटखा लगेच दुसऱ्या दिवशी जाळल्याची प्रथमच ही कारवाई साहायक आयुक्त लोभसिंह राठोड, निरीक्षक रावसाहेब वाकडे यांनी केली.
आयपीएस अधिकारी भांबरे आणि एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसीतील गोडावूनमधून ३५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून गुटख्याचा साठा नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही जोरदार कारवाई करीत गुटखा माफियांना दणका मोठा दणका दिला आहे.
पोलिसांना अधिकार नसताना छापेमारी
उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या एका याचिकेनंतर न्यायालयाने पोलिसांना गुटखा जप्त करण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. गुटखा साठ्यावर छापेमारी करण्याचे अधिकारही पोलिसांना नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. पोलिसांना माहिती मिळाली तर त्यांनी ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देऊन त्यांना सोबत घेतल्यानंतरच कारवाई करण्याच्या सूचना न्यायालयाने दिलेल्या आहेत; मात्र त्यानंतरही अकोला पोलिसांची गुटखा साठ्यावर छापेमारी सुरूअसून, यामधून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
गुटखा माफियांवर कारवाई का नाही?
दोन दिवसात तब्बल ३० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असला तरी पोलीस किंवा अन्न व औषध प्रशासन विभागाने अद्याप या गुटख्याचा खरा मालक शोधला नसल्याने संशय निर्माण होत आहे. या ठिकाणचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून, नेमका मालक कोण आहे, हे स्पष्ट केले नाही, गोदाम भाड्याचे असल्यामुळे शोध लागत नसल्याचे हास्यास्पद उत्तर देण्यात येत असून, दोन ट्रक गुटखा ज्या गोदामातून जप्त केला त्याच्या मालकांना पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडूनच अभय मिळत आहे.
हैद्राबादमध्ये दिलीपचे कनेक्शन
एका ट्रेडर्सचा मालक असलेला दिलीप हा जिल्ह्यातच नव्हे तर वाशिम व बुलडाण्यातील गुटखा माफियांना विविध कंपन्यांचा गुटखा पोहोचविण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दिलीप हैद्राबादमध्ये मोठ्या कंपनीच्या संपर्कात असून, त्या ठिकाणावरून ट्रकने गुटखा आणणे आणि त्याची या तीन जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या माफियांमार्फत विक्री करण्याचे काम करीत आहे. दिलीपने आता जिल्ह्यात नवीन जोडगोडी तयार केली असून, त्यांच्या माध्यमातूनच गुटख्याची मोठी उलाढाल सुरू असल्याची चर्चा आहे.