अन्न व औषध प्रशासनाने खव्याचा साठा केला जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 10:29 AM2020-11-03T10:29:59+5:302020-11-03T10:30:21+5:30
Food and Drugs, Akola News कमी दर्जाचा १४८ किलो गोड कुंदा व ९४ किलो मिल्क केक जप्त केला
अकोला : सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध प्रतीचे खाद्यान्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. शनिवारी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने हेगडेवार रक्तपेढीमागे केला प्लॉट येथील वैभव गणेश मोडक याच्या राहत्या घरी छापा टाकला. दरम्यान, कमी दर्जाचा १४८ किलो गोड कुंदा व ९४ किलो मिल्क केक जप्त केला. हा खवा शहरातील किरकोळ स्वीट मार्ट दुकानदारांना विकत असल्याचा संशय आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी रावसाहेब वाकडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांचे पथकाने शनिवारी सकाळी १०.३० वाजता हेगडेवार रक्तपेढीमागे, केला प्लॉट, अकोला येथील वैभव गणेश मोडक याच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी त्यांना १४८ किलो गोड कुंदा, ९४ किलो मिल्क केक असा साठा दिसून आला. त्यावर कुठलेही लेबल नव्हते. तसेच खरेदी बिलही दिसून आले नाही किंवा त्यावर बेस्ट बिफोर तारखेचा उल्लेख नसल्याने तो कमी दर्जाच्या असल्याच्या संशयावरून हा साठा जप्त केला. आरोपी वैभव मोडक हा सदर मिठाईचा साठा शहरातील किरकोळ स्वीट मार्ट दुकानदारांना विकत असल्याचा संशय आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी वाकडे पुढील तपास करत आहेत. सदरचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरची कारवाई सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी केली आहे.