रुग्ण अन् त्यांच्या नातेवाइकांसाठी देवदूत ठरताहेत अन्नदाते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:29 AM2020-04-11T10:29:26+5:302020-04-11T10:30:04+5:30
डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी, अशा एकूण ६५० ते ७०० जणांना दररोज अन्नदान करीत आहेत.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उपचारासाठी अकोल्यात आलेले अनेकजण संचारबंदीमुळे रुग्णालयातच अडकले आहेत, तर वृद्ध अन् दिव्यांगांनाही अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे शक्य नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रातील काही लोकांनी अभिनव उपक्रम राबवून रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांसह डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी, अशा एकूण ६५० ते ७०० जणांना दररोज अन्नदान करीत आहेत.
कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी अन् सीमाबंदी असल्याने बाहेरगावाहून आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक घरी परत जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत अकोल्यात अडकल्याने त्यांना जेवणाचीही सोय होत नाही, तर राहण्याचीही सोय होत नाही. संकटात अडकलेल्या या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी काही अन्नदाते देवदूत म्हणून धावून आले आहेत. सेवाभावाने हे सर्व अन्नदाते या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसह रात्रंदिवस रुग्णसेवेत मग्न असलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही अन्नदान करीत आहेत.
याशिवाय शहरातील वृद्ध, दिव्यांग आणि इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपर्यंतही जेवणाचे डबे पोहोचविण्यात येत आहेत. २६ मार्चपासून या सेवाभावी कार्याला सुरुवात करण्यात आली असून, ती आजतागायत निरंतर सुरू आहे. विशेष म्हणजे, सेवाभावी कार्य करणाºया १० ते १५ जणांची ही चमू प्रसिद्धीपासून स्वत:ला दूर ठेवून आहे. त्यांच्या या कार्याला सतीश कोठारी, संतोष हेडा, दीपक सालेछा, प्रशांत कोठारी, आनंद चौधरी, संतोष छाजेड, शैलेंद्र पारख, कोमल जैन, जितेश संकलेजा, प्रवीण कोठारी, रोशन खाबिया, सुमित गलानी, अमित चंदवानी, वेद पिदडी, अतुल ओरा, प्रवीण खटोळ, डॉ. अभय जैन, मोना चौधरी आदी मंडळी हातभार लावत आहेत.
६० रुग्णालयांमध्ये पुरविली जात आहे सुविधा
या अन्नदात्यांमार्फत शहरातील जवळपास ६० लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे नोंद झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाने जेवणाचा डबा तयार करून, तो संबंधित रुग्णालयात नियुक्त एका व्यक्तीपर्यंत पोहोचविल्या जातो. त्या व्यक्तीमार्फतच नोंद झालेल्या व्यक्तीला डबा दिल्या जातो.
संस्था नसूनही ते झाले संघटित
हे सर्व अन्नदाते शहरातील विविध रुग्णालयांतील तसेच इतर भागातील मेडिकल स्टोअर्स व्यावसायिक आहेत. जवळपास आठ ते दहा लोकांच्या या चमूची कुठलीही विशेष संस्था नाही; मात्र सेवाभावाने कार्य करायचे म्हणून ते संघटित होऊन निरंतर अन्नदानाचे कार्य करीत आहेत. यासाठी त्यांनी आदी सर्व्हे करून त्या ठिकाणी यंत्रणा लावली.
प्रत्येक लाभार्थीची होते नोंद
सेवाभावी केलेले अन्नदान हे गरजू व्यक्तींपर्यंतच पोहोचले पाहिजे, असा उद्देश ठेवून ही मंडळी निरंतर कार्यरत आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीला जेवणाचा डबा पोहोचविला जातो, त्या प्रत्येकाची नोंद आणि संपर्क क्रमांकाची नोंद केली जात आहे.