बचत गटांना मिळणारे धान्य, रॉकेल परवाने दडपले!
By admin | Published: March 9, 2017 03:31 AM2017-03-09T03:31:49+5:302017-03-09T03:31:49+5:30
अनेक वर्षांंंपासून दुकाने, रॉकेल वाटपात लाटला मलिदा
अकोला, दि. ८- महिला सक्षमीकरणासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकाने, रॉकेल परवाने महिलांना देण्याचे धोरण आखले. त्या धोरणाला हरताळ फासत ठरावीक दुकानदारांचे हित जोपासण्यासाठी गेल्या काही वर्षांंंत रिक्त झालेले परवाने बचत गटांना देण्यासाठी जाहीरनामे न काढता दडपण्यात आल्याचा प्रकार पुरवठा विभागात घडला आहे.
रोजगाराचे साधन म्हणून महिलांना स्वस्त धान्य दुकाने, रॉकेल वाटप परवाने देण्यासाठी नोव्हेंबर २00७ पासून सुरुवात झाली. त्यानुसार जिल्ह्यातील नव्या दुकानांचे, रॉकेल परवाने महिला बचत गटांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती सुरूच आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने जुलै २0१५ मध्येही शंभरपेक्षाही अधिक परवाने देण्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यामध्ये बचत गटांनी अर्जही केले. त्यांना अंतिम मंजुरीची प्रक्रिया रखडलेली आहे. ग्रामसभेच्या ठरावानंतर ती दिली जाईल, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्याचवेळी जाहीरनामे काढण्यासाठी पात्र असलेली ९ धान्य दुकाने आणि १६ रॉकेल परवाने बचत गटांना देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही सर्व दुकाने आणि रॉकेल परवाने काही खास दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांना जोडलेली होती. त्यामध्ये काही स्वस्त धान्य दुकानदार संघटना, केरोसिन विक्रे ता संघटनेचे पदाधिकार्यांचाही समावेश आहे. पाच वर्षांंंपेक्षाही अधिक काळापासून रिक्त असलेले दुकाने, रॉकेल परवाने देण्याला एवढा विलंब कशासाठी करण्यात आला, याबाबत पुरवठा विभाग आता संबंधित तहसीलदारांकडे बोट दाखवत आहे. अकोला ग्रामीण, शहर आणि अकोट तालुक्यात हा प्रकार मोठय़ा प्रमाणात घडला आहे.
जाहीरनाम्यासाठी पात्र दुकाने, रॉकेल परवाने
बचत गटांना वाटप करावयासाठी पात्र असलेल्यांमध्ये अकोला तालुक्यातील आखतवाडा येथे धान्य दुकान आणि रॉकेल परवाना, केवळ रास्त भाव दुकान देण्यासाठी डाबकी जहॉ, ढगा, टाकळी पोटे, येवता, वडद खुर्द. रॉकेल परवान्यासाठी खरप बुद्रुक, आपातापा, अनकवाडी, बादलापूर, लाखोंडा बुद्रूक, पातूर नंदापूर, लोणी, पाटी, रोहणा, देवळी, लोणाग्रा, डाबकी, खरप खुर्द, सोमठाणा. अकोट तालुक्यातील पुंडा येथे स्वस्त धान्य दुकान, अकोला शहरातील खंगरपुरा आणि खदान येथील दुकान क्रमांक अनुक्रमे ५५, ९५ चा समावेश आहे.