अन्न प्रक्रीया निर्मिती, निर्यात अकोल्यातून शक्य - सुनिता फाल्गुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 06:41 PM2019-03-13T18:41:52+5:302019-03-13T18:51:34+5:30
अकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला.
- संजय खांडेकर
अकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर मुंबई आणि अकोला इंडस्ट्रीज असोसिएशच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक औद्योगीक वसाहतीत अन्न प्रक्रीय अद्योगासंदर्भात एक दिवसीय चर्चासत्र मंगळवारी पार पडले. लोकमतने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद.
प्रश्न : अन्न प्रक्रीया निर्मिती आणि निर्यात अकोल्यातून कशी होईल ?
उत्तर : मंगळवारच्या चर्चासत्रातून अकोल्यात अनेक तज्ज्ञ आणि प्रयोगशील कास्तकार असल्याचे समोर आले आहे. केसर आंबा, काजू, आवळा, मोसंबी, चीक्कू, रामफळ, सीताफळ, जांभूळ ,डाळींब, केळी आदी विविध फळांच्या पीकांचे उत्पादन अकोल्यात होते. या पीकांसोबत काही शेतकऱ्यांनी अन्न प्रक्रीया साखळी निर्मिती सुरू केली आहे. अशा शेतकरी-उद्योजकांच्या उत्पादनाला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकते. मुंबई, पुणे आणि नाशिकच्या अनेक कंपन्यांची सांगड करून दिली तर अकोल्यातून निर्यात शक्य आहे.
प्रश्न : महाराष्ट्र चेंबरचा प्रयोग उद्योजकांसाठी कि शेतकऱ्यांसाठी आहे ?
उत्तर : शेतकरी आणि उद्योजक एकमेकांना पुरक कार्य करीत असतात. परंपरागत शेतीचे दिवस आता नाही. त्यामुळे अनंत समस्या निर्माण होत आहे. प्रगतशील शेती आणि अन्न प्रक्रीया साखळी निर्मितीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास ते उद्योजक होऊ शकतात. किंवा उद्योजकांसाठी शेतकºयांचे उत्पादन महत्वाची कामगिरी पार पाडू शकते. शेतकरी आणि उद्योजक दोघांच्या एकंदरीत विकासासाठी महाराष्ट्र चेंबरचा हा प्रयोग सुरू आहे.
प्रश्न : योजनांचा लाभ मिळत नाही अनेकांना मिळत नाही कारण काय ?
उत्तर : उद्योजक आणि शेतकºयांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना अस्तीत्वात येत आहे. मात्र अनेकदा या योजनांची माहिती तळागाळात जात नाही. शोषण सुरू होते. त्यासाठीच भविष्यात नॉलेज सेंटर उभारले जाणार आहे. यामुळे मानसिकतेत बदल तर होऊलच सोबतच नव्या बाजारपेठा आणि बदल शेतकरी आणि उद्योजकांना कळेल. अनेक उद्योगांमध्ये व्हॅल्यू एडीशन होत नसल्याने ते उद्योग बंद पडत आहे, त्यांना संजीवणी मिळेल.
प्रश्न : कृषी आणि उद्योगसंदर्भातील तांत्रिक अडचणी कश्या दूर होतील ?
उत्तर : कृषी आणि उद्योजकांना नेहमीच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. मातीचे परीक्षण, अन्न प्रक्रीया साखळी निर्मितीचे नमुने यासाठी प्रयोगशाळांचे अहवाल आवश्यक असतात. अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या प्रमुखांकडे जाऊन या सेवा आम्हाला द्या म्हणून शेतकºयांनी आवाज उठविला पाहिजे. तांत्रीकबाबी देखिल भविष्यात नॉलेज सेंटरच्या माध्यमातून यातील तज्ज्ञांना पाचारण करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत.
प्रश्न : सबसीडीच्या लाभासाठीच उद्योग उघडले जातात का ?
उत्तर : अनेकजण केवळ सबसीडीच्या साठी उद्योग उघडतात, मात्र तसे सर्व नाही. अनेक उद्योजकांवर कर्जही होत असते. उद्योगांना उभारी देण्यासाठी महाराष्ट्र चेबरचे प्रयत्न सुरू आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही अन्न प्रक्रीया साखळीचे नवे उद्योग उभारण्याचा उपक्रम हाती घेत आहोत. त्यात शासनाची सबसीडी आॅक्सीजन देते.