धान्य दानपेटीतून गोरगरिबांना धान्याचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 11:44 IST2020-04-07T11:44:31+5:302020-04-07T11:44:38+5:30
बाळापूर पुरवठा विभागाच्या संकल्पनेतून ‘धान्य दानपेटी’ स्वस्त धान्य दुकानासमोर ठेवण्यात आली असून, या उपक्रमाचा प्रारंभ अंदुरा येथे सोमवारी झाला.

धान्य दानपेटीतून गोरगरिबांना धान्याचा आधार!
- संतोष गव्हाळे
हातरुण : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. संचारबंदी व जमावबंदी असल्याने अशावेळी हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब आणि रोजगाराच्या शोधात आलेल्या परप्रांतीय नागरिकांच्या हाताला काम नाही, तसेच जवळ पैसा नाही. या कारणाने जगावे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. बाळापूर पुरवठा विभागाच्या संकल्पनेतून ‘धान्य दानपेटी’ स्वस्त धान्य दुकानासमोर ठेवण्यात आली असून, या उपक्रमाचा प्रारंभ अंदुरा येथे सोमवारी झाला. यावेळी अंदुरा येथे ११ क्विंटल धान्य दान म्हणून मिळाल्याची माहिती पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतल्यानंतर ज्या शिधापत्रिकाधारकाला गोरगरिबांना धान्य दान देण्याची इच्छा आहे त्यांनी स्वस्त धान्य दुकानासमोर असलेल्या धान्य दानपेटीत धान्य देऊन अन्नदान करायचे आहे. गावातील नागरिकही या धान्य दानपेटीत धान्य देऊ शकतात. बाळापूर तालुक्यातील ११४ स्वस्त धान्य दुकानासमोर ठेवण्यात येणाºया धान्य दानपेटीतील सर्व धान्य गोरगरीब आणि परप्रांतीय नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.
स्व. महादेव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निंबा येथील यमुनाबाई महादेव कोल्हे यांच्याकडून ५ क्विंटल गहू तसेच अंदुरा येथील रामदास शिंगोलकार यांच्याकडून ५ क्विंटल गहू, शेतकरी संजय घंगाळे, ज्ञानदेव रोहनकार, संजय वानखडे, रेखाबाई साबळे यांनी धान्य दानपेटीत सोमवारी दान केले.
उपाशीपोटी कोणी राहू नये या हेतूने हा उपक्रम बाळापूर तालुक्यात राबविण्यास प्रारंभ झाला असून, धान्य दानपेटी उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बाळापूर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पुरवठा विभागाचे निरीक्षक मोहन कोल्हे यांनी केले आहे.
अंदुरा परिसरातील १८ परप्रांतीयांना मिळाले धान्य!
रोजगाराच्या शोधात अंदुरा शेतशिवारात आलेल्या आणि सध्या शेतकरी संजय घंगाळे यांच्या शेतातील गोडाऊनमध्ये असलेल्या मध्यप्रदेशमधील १८ नागरिकांना बाळापूर तालुका पुरवठा विभागाच्या संकल्पनेतून साकारलेल्या धान्य दानपेटी उपक्रमातून सोमवारी गहू, तांदूळ असे क्विंटलभर धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते मुकेश गव्हाणकर, संजय घंगाळे, संजय वानखडे, पोलीस पाटील ज्ञानदेव रोहनकार, नाना शिंगोलकार यांच्या हस्ते सोमवारी शेताच्या बांधावर जाऊन वाटप करण्यात आले. या १८ नागरिकांच्या समस्येवर ‘लोकमत’ मधून प्रकाशझोत टाकण्यात आला होता. हे विशेष!