बंगळूरू , नागपूरमधील मुले अकोल्यात घेताहेत फुटबॉलचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:08 PM2018-05-08T15:08:43+5:302018-05-08T15:08:43+5:30
यंदा आयोजित उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात अकोला शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर बंगळुरू , नागपूर, हिंगोली, वाशिम,मालेगाव येथील मुले दाखल झाले आहेत.
अकोला: ‘मिनी कलकत्ता (कोलकाता)’असे एकेकाळी ओळख फुटबॉल जगतात अकोला शहराचे नाव होते. मध्यंतरी ही ओळख धुसर झाली; मात्र आता नव्याने अकोला फुटबॉलमध्ये चैतन्य स्फुरले आहे. यंदा आयोजित उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात अकोला शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर बंगळुरू , नागपूर, हिंगोली, वाशिम,मालेगाव येथील मुले दाखल झाले आहेत.
मोहसिन अली शहिदी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित नि:शुल्क फुटबॉल प्रशिक्षण शिबिर यंग ब्लड फुटबॉल क्लबने आयोजित केले आहे. या शिबिरात ६ ते १९ वर्ष वयोगटातील १३५ मुले फुटबॉलचे धडे गिरवित आहे. मुलांनी मोबाईल आणि टी.व्ही.पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवून मैदानाशी नाते जुळवावे, हा शिबिर आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. देशाची भावी पिढीचे शरीर तंदुरू स्त राहून मन बळकट होण्याकरिता व्यायामासोबतच ध्यानधारणा करणे शिकविण्यात येत आहे. तसेच सकस आहाराबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर भारताने फुटबॉलमध्ये नावलौकिक करावे, याकरिता शिबिरातून उच्चस्तर खेळाडू निर्माण करण्याचा संकल्प यंग फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकांचा मानस आहे.
वरिष्ठ फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल सत्तार कुरेशी शिबिरार्थींकडून व्यायाम करवून घेतात. तसेच शिस्तीचे धडे देतात. तसेच फुटबॉलमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रशुद्ध कसे खेळायचे, याबाबत प्रशिक्षक अन्जार अहमद कुरेशी प्रशिक्षण देत आहेत. शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थींना नियमित नास्ता आणि पौष्टिक आहार देण्यात येतो. शिबिर सकाळी ६ ते ८ यावेळेत घेण्यात येते. सावित्रीबाई फुले कन्या शाळा (गर्व्हनमेंट गर्ल्स स्कूल)मैदान येथे शिबिर सुरू असून, इच्छुकांना प्रवेश देणे सुरू आहे. शिबिर संपूर्णपणे नि:शुल्क आहे. शिबिराला अकोला जिल्हा फुटबॉल संघटनेचे सय्यद जावेद अली, नितीन देशमुख, अनिल बाजोरिया यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.