शहरात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारले विरंगुळा केंद्र; महापालिकेचा उपक्रम
By आशीष गावंडे | Published: August 25, 2023 06:41 PM2023-08-25T18:41:14+5:302023-08-25T18:41:32+5:30
मुख्य पाेस्ट ऑफीस मागे मनपा शाळेत लाेकार्पण
अकोला: आयुष्याच्या सायंकाळी काही क्षण निवांत घालविण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरु केले आहे. मुख्य पाेस्ट ऑफीस मागील मनपाच्या शाळा क्रमांक ११ मध्ये मनपाने ज्येष्ठ नागरिकांना करमणुकीसाठी विविध साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी निशुल्क उपक्रम सुरु केल्यामुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेचे काैतुक केले जात आहे.
कुटुंबाची व पाेटच्या मुलाबाळांची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी करणाऱ्या आइ-वडिलांना वृध्दापकाळात घरातीलच सदस्यांकडून अपमानजक वागणूक दिली जाते. आयुष्याचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा,अशी सर्वांची मनाेमन इच्छा राहते. परंतु काही संवेदना हरपलेल्या पाल्यांकडून वयाेवृध्द माता-पित्यांचा मानसिक छळ केला जाताे. अनेकदा पाेटचा मुलगा व सून खाण्यापिण्याची आबाळ करत असल्याच्या तक्रारी पाेलिस ठाण्यात दाखल हाेतात.
घरात मिळणाऱ्या अपमानजनक वागणुकीमुळे आत्मसन्मान दुखावलेल्या वयाेवृध्दांना घरात राहणे नकाेसे हाेते. अशावेळी त्यांना उर्वरित आयुष्यातील काही क्षण निवांत घालवता यावेत, या उदात्त भावनेतून महापालिका प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला हाेता. या निर्णयाला प्रशासनाने मुर्तरुप दिले असून मुख्य पाेस्ट ऑफीस मागील महापालिकेच्या शाळा क्रमांक ११ मधील दाेन प्रशस्त वर्ग खाेल्यांमध्ये विरंगुळा केंद्र सुरु केले आहे. शहरातील समस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम निशुल्क असणार आहे. या उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाला मदत
मागील अनेक वर्षांपासून ज्येष्ठांसाठी व विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नाेंदविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाला महापालिकेने शाळेच्या आवारात वर्ग खाेली उपलब्ध करुन दिली हाेती. हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळे प्रशासनाने दाेन वर्ग खाेल्यांचे नुतणीकरण केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या केंद्राचा लाेकार्पण साेहळा पार पाडला.
मनपाकडून साहित्य,मुलभूत सुविधांची पूर्तता
महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या मनाेरंजनासाठी एक एलइडी, दाेन कॅरम बोर्ड, गित गायनासाठी साउंड सिस्टीम, वाचनासाठी कथा, कादंबऱ्या व पुस्तके, बैठक व्यवस्थेकरिता खुर्च्या, सतरंज्या आदी साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. तसेच अधिकृत विद्यूत कनेक्शन, नळ जाेडणी देत छतावर टाकी बसवून पाणीपुरवठ्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा दिली आहे.