विदर्भात प्रथमच रब्बी हंगामात सर्वच तृणधान्यांची लागवड
By रवी दामोदर | Published: February 10, 2024 04:44 PM2024-02-10T16:44:30+5:302024-02-10T16:47:23+5:30
बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड शिवारात शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी.
रवी दामोदर,अकोला : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आधूनिक शेतीकडे वळला आहे. कृषी विभागामार्फत जनजागृतीमुळे बहुतांश शेतकरी नवे प्रयोग करण्याचे धाडस दाखवितात. अशाच प्रकारे बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड शिवारात शेतकरी रुपेश लडे यांनी रब्बी हंगामात, ज्वारी, भात, नाचणी, कोडो मिलेट्स, सांवा मिलेट्स यांसह बाजरीच्या प्रत्येक वाणांसह सर्वच तृणधान्यांची पेरणी केली आहे. सध्या शेतशिवारामध्ये बाजरीचे पीक फुलले असून, कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी बाजरी पिकावरील प्रक्रिया, तर विवेक खांबलकर यांनी बाजरीची काढणी, साठवणूक या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळेचे अध्यक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी बाजरीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ कसे बनवावे, रेसिपी याबाबत महिला बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन केले, तसेच कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा लाभ तृणधान्य मूल्यवर्धन कसे करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कातखेड येथील शेतात रब्बी हंगामामध्ये प्रकारचे मेजर मिलेट्स व मायनर मिलेट्स लागवड करण्यात आल्याने शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला.
शेतकऱ्यांना कार्यशाळेतून मार्गदर्शन :
अन्न व पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके (पौष्टिक तृणधान्य) सण २०२३-२४ अंतर्गत जिल्हास्तरीय तृणधान्य कार्यशाळा दि.९ फेब्रुवारी बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड शिवारात घेण्यात आली. कार्यशाळेला जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, कृषी उपसंचालक विलास वाशिमकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गोपाल ठाकरे, डॉ. संतोष दिवेकर, डॉ. विवेक खांबलकर यासह शेतकरी रुपेश लडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन कृषी उपसंचालक विलास वाशिमकर यांनी केले, तर आभार शिवाजी जाधव यांनी मानले.