रस्त्यासाठी शेकापूर ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेत धडक !
By संतोष येलकर | Published: September 18, 2023 08:09 PM2023-09-18T20:09:34+5:302023-09-18T20:09:42+5:30
शेकापूर आलेगाव रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी
अकोला: जिल्हयातील पातूर तालुक्यात शेकापूर ते आलेगाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी करीत, सोमवारी शेकापूर येथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत धडक दिली.
जिल्हा परिषद अध्यक्षांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शेकापूर ते आलेगाव या गावाच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला कमालीचा अडथळा होत असून, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना ये जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यावर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकापूर ते आलेगाव या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी करीत शेकापूर येथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांना निवेदन सादर करण्यात आले असून, रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेकापूरच्या सरपंच सरिता पवार यांच्यासह सुभाष राठोड, बालूसिंग राठोड, रमेश राठोड, शेषराव राठोड, हिरचंद्र पवार, मधुकर राठोड, शंकर राठोड, श्याम पवार आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो त्रास !
शेकापूर ते आलेगाव या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने या रस्त्याने शाळेत ये जा करताना शेकापूरच्या विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, असेही शेकापूरच्या सरपंचांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.