उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी सक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:35 PM2020-07-03T17:35:04+5:302020-07-03T17:36:17+5:30
मुलांना शाळेत पाठविण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला : शासनाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिलेत; परंतु त्यातही अटी व नियम घालून दिले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, तूर्तास शाळा सुरू करणे धोकादायक असतानासुद्धा अकोट फैलातील मिल्लत उर्दू हायस्कूल व प्राथमिक शाळेतील पालकांकडून एकतर्फी संमतिपत्र भरून घेत, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांनाही पालकांच्या घरी पाठवून संमतिपत्र भरवून घेण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या अकोट फैलमधील मिल्लत उर्दू हायस्कूल व प्राथमिक शाळेतील शिक्षकांना संस्थाचालक शिक्षक, शिक्षिकांना दररोज शाळेत बोलावत आहेत. त्यांना शाळा सुरू करण्यासाठी घरोघरी फिरून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भेटी घेण्यास बजावत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षण संस्थेने तयार केलेले संमतिपत्र पालकांकडून सक्तीने भरून घेण्यात येत आहेत. अकोट फैल हा परिसर अगोदर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला असताना, पालकांच्या घरोघरी जाण्यास सांगितल्यामुळे शिक्षकही चांगलेच धास्तावले आहेत. संस्थाचालकांच्या दबावात येऊन शिक्षकांना काम करावे लागत असल्याने, ते काहीही बोलण्यास असमर्थ आहेत. हा भाग हॉटस्पॉट असल्यामुळे शाळा सुरू केली तर विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो; त्यामुळे मिल्लत उर्दू शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन शाळा सुरू करण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
शाळा सुरू न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्यास सांगितले जाईल. सध्या शाळा सुरू करण्याची घाई करू नये. कोणी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करीत असेल तर कारवाई करू.
- प्रकाश मुकुंद,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक
शिक्षकांना पालकांकडून संमतिपत्र भरून आणण्यासाठी कोणतीही सक्ती केली नाही. ते संमतीपत्र आमच्या शाळेने तयार केले नाहीत. कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही. प्रशासनाची व शिक्षण विभागाची परवानगी घेऊनच निर्णय घेण्यात येईल. शासनाच्या नियम व अटींचे पालन आम्ही करू. विनाकारण कोणीतरी अपप्रचार करीत आहे.
-प्रा. सरफराज खान, प्राचार्य, मिल्लत उर्दू हायस्कूल