विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:16 AM2020-09-06T11:16:28+5:302020-09-06T11:16:44+5:30
विजय पान सेंटरजवळ उभ्या असलेल्या तन्वीर ऊर्फ सोनू याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले.
अकोला : स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी गंगा नगरमधील मिल्लत कॉलनी येथील विजय पान सेंटरजवळ उभ्या असलेल्या तन्वीर ऊर्फ सोनू याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीस रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
तन्वीर अहेमद ऊर्फ सोनू जहागीर खान (२४) रा. मिल्लत कॉलनी, गंगा नगर याच्याकडे कट्टा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने सदर ठिकाणावर छापा टाकून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचा कट्टा असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अग्निशस्त्र बाळगण्याबाबत परवाना मागितला असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. सदर विदेशी बनावटीच्या कट्ट्याची किंमत २५ हजार रुपये असल्याची माहिती आहे. सदर आरोपीविरुद्ध ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सा. प्रशांत वाघुर्डे, पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सागर हटवार, अशोक चाटी, राजपालसिंह ठाकूर, नितीन ठाकरे, रफिक शेख, इजाज अहेमद, रवी इरच्छे, संदीप तवाडे, अब्दुल माजिद, नफीस शेख यांनी केली आहे.