दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना वन परीक्षेत्र अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 03:43 PM2019-01-02T15:43:18+5:302019-01-02T15:43:46+5:30
अकोला : जंगलातून कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्याची परवाणगी देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शेषराव कातखेडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.
अकोला : जंगलातून कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्याची परवाणगी देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शेषराव कातखेडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. कातखेडे यांच्यासाठी काम करणाऱ्या काशीराम तुळशीराम मनवर या सेवानिवृत्त वन मजूराही ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारकर्ता हा लाकडाचा कंत्राटदार असून, त्याने जंगालातून कापलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे यांच्याकडे परवानगी मागितली. राजेंद्र कातखेडे यांनी परवानगी देण्याच्या मोबदल्यात त्यांच्यासाठी खासगी काम करणाºया काशीराम मनवर यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्यामुळे त्याने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानूसार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी १ जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर २ जानेवारी रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय,सिंधी कॅम्प ,अकोला येथे सापळा रचला. यावेळी काशीराम मनवर याने राजेंद्र कातखेडे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारली व स्वत:साठीही एक हजार रुपयांची स्वतंत्र मागणी केली. यावेळी दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या अधिकाºयांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लाचेची दहा हजार रुपयांची रक्कम जप्त केली.
ही कारवाई तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले, पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्यासह सुनील राऊत, संतोष दहीहंडे, राहुल इंगळे, निलेश शेंगोकर, सचिन धात्रक,चालक प्रवीण कश्यप यांनी केली.