पातूरच्या माजी नगराध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:32 PM2020-07-01T17:32:25+5:302020-07-01T17:32:58+5:30
कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना उपचारार्थ अकोल्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
पातूर: पातूर तालुका व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत ३२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे पातूरच्या ६२ वर्षीय माजी नगराध्यक्षांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी माजी नगराध्यक्षांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना उपचारार्थ अकोल्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले होते; परंतु मंगळवारपासून त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली होती. त्यातच बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे पातुरातील हा दुसरा मृत्यू आहे. सध्या पातूर तालुक्यामध्ये १८ रुग्ण अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. अकोल्यातील रेड झोनमधून पातूर तालुका व शहरात येणाऱ्या व जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पातुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बाहेरगावी येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालावा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल, अन्यथा हा प्रकोप आणखी वाढण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)