माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन; मुंबईत घेतला अंतिम श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:24 PM2019-11-05T12:24:44+5:302019-11-05T13:08:31+5:30
मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेब यांनी मंगळवारी सकाळी ११. ३० वाजता अखेरचा श्वास घेतला.
अकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी जलसंधारण मंत्री केशवराव उपाख्य बाबासाहेब नारायणराव धाबेकर यांचे मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गत काही दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेब यांनी मंगळवारी सकाळी ११. ३० वाजता अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दिवंगत बाबासाहेब धाबेकरांचे पार्थिव अकोल्यात आणलें जाईल. बुधवारी दूपारी बारा वाजता धाबा येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. त्यांच्या मागे पत्नी , २ पुत्र सुनील धाबेकर , अनिल धाबेकर व मोठा आप्त परिवार आहे.
बाबासाहेब धाबेकर हे बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गावचे रहिवासी होते. धाबा ग्रामपंचायत सदस्य पदापासून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरु केली. उपसरपंच, सरपंच, बार्शीटाकळी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि.प. सभापती नंतर अध्यक्ष असा प्रवास करीत त्यांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली आणि त्यात ते विजयीसुद्धा झाले. आमदार झाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला. याच सरकारमध्ये त्यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागली. ग्रामविकास मंत्री, जलसंधारण खातं त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना गती दिली. यासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले. अकोला जिल्हा परिषदेचे सलग १५ वर्षे अध्यक्ष असलेले बाबासाहेब धाबेकार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात सलग २ वेळा मंत्री होते. ज्येष्ठ नेते स्व.डा आबासाहेब खेडकर यांचा पट्ट शिष्य असलेल्या या नेत्याने जिल्ह्याला विकासाची दिशा दिलेली आहे. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या जवळ असलेला हा माणूस शिस्तीचा , स्वच्छता , नीट नेटके पणाचा आणि अभ्यासू नेता होते. यासोबत त्यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकही लढविली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना धाबेकरांनी विकासकामांचा धडका लावत अकोला जिल्हा परिषदेला राज्यात वेगळी ओळख निर्माण करून दिली. सुतगिरणी, साखर कारखान्याची उभारणीही त्यांनी केली. त्यांच्या कार्यकाळात स्थापन झालेला साखर कारखाना त्यांनी हयात असेपर्यंत नफ्यात ठेवला. रोखठोक भूमिका घेणारे नेते व विकास महर्षी म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे व मैत्रिपूर्ण संबंध होते.