माजी राज्यमंत्री, सहकार नेते वसंतराव धोत्रे पंचतत्वात विलीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:54 PM2018-08-11T18:54:14+5:302018-08-11T18:58:09+5:30
अकोला: राज्याचे माजी राज्यमंत्री ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवारी सायंकाळी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी उमरी मोक्षधामात शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अकोला: राज्याचे माजी राज्यमंत्री ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवारी सायंकाळी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी उमरी मोक्षधामात शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीत लोकनेत्याला साश्रृनयनांनी निरोप देण्यात आला.
टाळ मृदुंग आणि कीर्तन करीत फुलांनी सजविलेल्या ट्रकवर वसंतराव धोत्रे यांचे पार्थिव आणण्यात आले. वसंतराव धोत्रे अमर रहे या घोषणेसह त्यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. तापडिया नगरातील त्यांच्या निवासस्थानावरून शोकाकूल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा निघाली. ही अंत्ययात्रा सातव चौक, जठारपेठ, राऊतवाडी, उमरी नाका मार्गाने मार्गक्रमण करीत उमरीतील मोक्षधामात पोहोचली. अंत्यदर्शनासाठी रस्त्यांच्या दुर्तफा नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. उमरी मोक्षधामात पार्थिव पोहोचले. याठिकाणी पार्थिवावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने २१ फैरी झाडण्यात येऊन माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांना मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी शोकाकूल पुत्र कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे उपस्थित होते. जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, भिमराव धोत्रे, साहेबराव धोत्रे, सत्यजित धोत्रे यांनी वसंतराव धोत्रे यांचे अंत्यदर्शन घेतले. शिरीष धोत्रे यांनी वडीलांच्या चितेला भडाग्नी दिला. अंत्ययात्रेत माजी मंत्री व बुलडाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, म्आमदार गोपीकिशन बाजोरिया, प्रा. अजहर हुसैन, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, माजी आ. अॅड. विजयराव जाधव, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आ. धृपदराव सावळे, सागर फुंडकर आदी मान्यवरांसह राजकीय, सहकार, शिव परिवारातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)