शैक्षणिक संस्थेच्या माजी पदाधिका-यांवर समलैंगिक शोषणाचा आरोप
By admin | Published: July 7, 2015 01:44 AM2015-07-07T01:44:41+5:302015-07-07T01:44:41+5:30
पत्रपरिषदेत दाखविली अश्लील चित्रफीत.
अकोला: नोकरीमध्ये कायम करण्याचे आमिष दाखवून समलैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप, शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या कर्मचार्याने त्याच संस्थेच्या दोन माजी पदाधिकार्यांवर सोमवारी पत्रकार परिषदेत केला. हा कर्मचारी युवक या शैक्षणिक संस्थेद्वारा चालविल्या जाणार्या एका महाविद्यालयाच्या वसतिगृहावर रोजंदारीने कार्यरत असून, त्याच्या आरोपांची सदर शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित शाळेच्या एका माजी मुख्याध्यापकानेही पुष्टी केल्याने खळबळ उडाली आहे. पीडित युवकाचा एक मित्र संबंधित महाविद्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याच्या ओळखीने महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाची देखभाल आणि बगिच्याचे काम करण्यासाठी, संस्थेच्या दोन माजी पदाधिकार्यांनी पीडित युवकाला २00७ मध्ये ४0 रुपये रोजाप्रमाणे कामावर घेतले होते. पीडित युवकाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पदाधिकार्यांनी त्याला नोकरीमध्ये कायम करण्याचे आमिष दाखवून, त्याच्याशी बलपूर्वक समलैंगिक संबंध प्रस्थापित केले. महाविद्यालयाच्या प्राध्यापक क्वॉर्टर्सवर बोलावून हे महाभाग स्वत: मद्यप्राशन करायचे आणि आपणासही बळजबरीने मद्यप्राशन करायला लावून लैंगिक चाळे करायचे. सात ते आठ वर्षे दोघांनीही आपला लैंगिक छळ केला; परंतु नोकरीत कायम केले नाही, अशी आपबिती पीडित युवकाने सोमवारी पत्रकार परिषदेत कथन केली. पत्रकार परिषदेस सदर शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित शाळेचे एक माजी मुख्याध्यापकही उपस्थित होते. न्याय मिळत नसल्याने यासंदर्भात सिव्हील लाईन्स पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले. युवकाच्या आरोपांची त्यांनीही पुष्टी केली. पीडित युवकाने आरोपांच्या पुष्ट्यर्थ, दोन्ही पदाधिकार्यांच्या विकृत मानसिकतेची १५ मिनिटांची चित्रफीत पत्रकार परिषदेत दाखविली. चित्रफितीमध्ये दोन्ही पदाधिकारी युवकाचे लैंगिक शोषण करताना दिसतात. यासंदर्भात दोन्ही पदाधिकार्यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांचेही भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले.