चार आरोपींना पोलिस कोठडी
By admin | Published: October 6, 2014 01:43 AM2014-10-06T01:43:26+5:302014-10-06T01:43:26+5:30
अकोला येथील गायकवाड हत्याकांड; आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी.
अकोला : भारती प्लॉटमधील सारंग गायकवाड याची हत्या करणार्या चौघा आरोपींना रविवारी प्र थमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.व्ही. हरणे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींना हजर करण्यापूर्वी न्यायालय परिसरात शस्त्रधारी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. यावेळी डाबकी रोड परिसरातील शेकडो युवकांनी न्यायालयात गर्दी केली होती. छेडखानीच्या वादातून गुंड सारंग अशोक गायकवाड (२२) याची शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास डाबकी रोडवरील मास्टर पॉवर जिमजवळ वानखडेनगरातील अभिषेक खरसाळे, संतोष चि तोडे आणि सोपीनाथनगरातील निखिल सहारकर, सतीश भोसले यांनी दगड व चाकूने वार करून त्याला जखमी केले. सारंगचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डाबकी रोड परिसरात युव तींची छेडखानी करणारा, किरकोळ वादातून धमक्या देऊन मारहाण करणारा बाळापूर नाक्यावरील भारती प्लॉटमधील सारंग गायकवाड याचा यापूर्वीसुद्धा आरोपींसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात समेटही झाला; परंतु सारंग गायकवाड हा आरोपींना नेहमीच जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा. त्यातूनच हे हत्याकांड घडले. आरोपींना न्यायालयात हजर करतेवेळी पोलिसांनी विशेष काळजी घेतली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आरोपींना न्यायालयात आणले होते. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हरणे यांच्या न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर डाबकी रोडचे ठाणेदार भारत रक्षाकर यांनी आरोपींना आठ दिवसांपर्यंत कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.