सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या लूट प्रकरणी अधिष्ठातांनी दिली चौघांची नावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 03:10 PM2020-01-19T15:10:17+5:302020-01-19T15:10:24+5:30
अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी पोलीस अधीक्षकांना चौघांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दलालांकडून गरीब रुग्णांची लूट थांबविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी पोलीस अधीक्षकांना चौघांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या बुलडाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी रुग्णांना उपचारासंदर्भात योग्य माहिती मिळत नसल्याने हेलपाटे घ्यावे लागतात. हीच बाब हेरून येथील दलाल मदतीच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी अधिष्ठाता यांच्या दालनात बैठक घेऊन दलालांचा बंदोबस्त लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या बैठकीनंतर १५ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना चौघांची नावे दिली असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यामध्ये आनंद शर्मा, दीपक खाडे, नितीन सपकाळ आणि आशिष सावळे यांचा समावेश असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या मर्जीतील दलाल मात्र मोकाट
अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी रुग्णांच्या लूट प्रकरणी चौघांवर कारवाईची मागणी केली; मात्र डॉक्टरांच्या मर्जीतील दलाल मोकाटच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी रानडुकराच्या लाभासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी एकाला पकडले होते. त्याविरोधात डॉ. चव्हाण यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती.
सर्वोपचार रुग्णालय परिसरात रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी चौघांची नावे पोलीस अधीक्षकांना दिली आहेत.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.