कत्तलीसाठी नेल्या जाणा-या चार जनावरांना जीवदान
By admin | Published: April 3, 2017 02:59 AM2017-04-03T02:59:02+5:302017-04-03T02:59:02+5:30
नऊ क्विंटल गोमांसासह ४.५0 लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला, दि. २- शहरातील विदर्भ हॉस्पिटलसमोरून गोवंश जनावरांच्या ९ क्विंटल मांसाची वाहतूक करणार्या वाहनांना अडवून यामधील मांस जप्त करण्यात आले. यासोबतच उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारस फाटा येथून कत्तलीसाठी नेण्यात येत असताना चार जनावरांनाही रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने जीवदान दिले. दोन्ही कारवाईमध्ये साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकोल्यातील विदर्भ हॉस्पिटल परिसरातून ९ क्विंटल गोवंशाचे मांस एमएच-२८-२६४४ क्रमांकाच्या मॅक्झिमो वाहनामध्ये नेण्यात येत होते. यासोबतच इंडिका कार क्रमांक एमएच ३0 एल ७२३३ मध्येही गोवंशातील जनावरांचे मास घेऊन जाण्यात येत होते. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून दोन्ही वाहने आणि गोवंशाचे मांस असा एकूण ४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोवंशाचे मांस घेऊन जाणार्या बोरगाव मंजू येथील रहिवासी अब्दुल अजहर शेख करीम, तौफीक अहमद मोहम्मद रफीक या दोघांना अटक करण्यात आली.
यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेने उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारस फाटा येथून एमएच- २८ -एस ९७३७ या दुचाकीसोबत चार गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करीत असताना पोलिसांनी पाळत ठेवून अनमोल सहदेव शेगोकार, राहुल बाबुराव मोरे या दोघांना अटक केली. या दोघांकडून ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.