उमरा येथे दोन दिवसात चार गायी दगावल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:17 AM2021-04-05T04:17:27+5:302021-04-05T04:17:27+5:30
खेट्री: येथून जवळच असलेल्या उमरा येथे गुरांमध्ये अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथे गेल्या दोन दिवसांमध्ये उपचाराअभावी चार गायी ...
खेट्री: येथून जवळच असलेल्या उमरा येथे गुरांमध्ये अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथे गेल्या दोन दिवसांमध्ये उपचाराअभावी चार गायी दगावल्याची घटना रविवारी उघडकीस आल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उमरा येथील पशू उपचार केंद्राला नेहमी कुलूप असते. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
उमरा येथे पशू उपाचार केंद्र आहे; मात्र नेहमी कुलूप बंद असते. याबाबत संबंधित वरिष्ठाकडे पशुपालकांनी वारंवार तक्रारी केल्या; परंतु संबंधितांकडून पशुपालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. तसेच उपचार केंद्राचा कारभार खासगी डॉक्टर चालवित असल्याचा प्रकार येथे सुरू आहे. पशू उपचार केंद्र असूनही पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
बॉक्स
औषध उघड्यावर फेकल्याचे प्रकरण दडपले
पशू उपचार केंद्रातील मुदत असलेल्या औषधीचा वापर न करता हजारो रुपयांचा औषधीचा साठा उघड्यावर तसेच एका खड्ड्यात टाकण्यात आल्याचा प्रकार सन २०२० च्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये उघडकीस आला होता; परंतु चार महिन्यांचा कालावधी उलटूनही या फेकलेल्या औषध साठ्याची चौकशी न करता प्रकरण संबंधित वरिष्ठांनी दडपल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------------
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पशू उपचार केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. त्यामुळे उपचाराअभावी दोन दिवसांत चार गायी दगावल्या आहेत. परिसरातील गुरेही उपचाराअभावी दगावल्याच्या घटनेत वाढ होत आहे. संबंधिताकडे वारंवार तक्रार केली; परंतु परिस्थिती जैसे थे आहे.
-छोटू देशमुख, पशुपालक, उमरा.
------------------------------
पशू उपचार केंद्राला नेहमी कुलूप असते. त्यामुळे उपचाराअभावी गुरे दगावल्याच्या घटना तर घडतच आहे; मात्र पशुपालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
-विठ्ठल मुके, पशुपालक, उमरा.