पारस औष्णिक विद्युत केंद्रात चार दिवस पुरेल एवढाच कोळसा!
By Atul.jaiswal | Published: September 29, 2019 01:21 PM2019-09-29T13:21:12+5:302019-09-29T13:21:48+5:30
५०० मेगावॉट क्षमता असलेल्या या केंद्रातून आजघडीला केवळ २०० मेगावॉट एवढीच विद्युत निर्मिती होत आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला: कोळशाच्या तुटवड्याचा परिणाम महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेनको)च्या इतर औष्णिक विद्युत केंद्रांप्रमाणेच पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रावरही झाला असून, या ठिकाणी केवळ चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. भरीस-भर म्हणून पारस येथील एक विद्युत निर्मिती संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद असल्याने ५०० मेगावॉट क्षमता असलेल्या या केंद्रातून आजघडीला केवळ २०० मेगावॉट एवढीच विद्युत निर्मिती होत आहे.
सततच्या पावसामुळे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोलि) खाणींमध्ये पाणी भरल्याने कोळसा ओला झाला असून, विद्युत निर्मिती केंद्रांना कोळशाची कमतरता भासत आहे. कोळशाअभावी राज्यातील विद्युत निर्मिती केंद्रातील तब्बल १८ युनिट ठप्प झाले आहेत. तुटवड्याचा परिणाम अकोला जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रावरही पडला आहे. या केंद्रात २५०-२५० मेगावॉट क्षमतेचे दोन विद्युत निर्मिती संच आहेत. यापैकी ४ क्रमांकाचा संच गत महिनाभरापासून देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. तीन क्रमांकाच्या संचातून सध्या विद्युत निर्मिती सुरू आहे. हा संच चालू ठेवण्यासाठी दररोज ३ हजार ५०० ते ४,००० टन कोळसा जाळावा लागत आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात कोळसा जाळल्यानंतरही केवळ २०० मेगावॉट विद्युत निर्मिती होत आहे. दरम्यान, कोळशाच्या तुटवड्याचा विद्युत निर्मितीवर फरक पडला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दररोज एक रॅक कोळसा
‘वेकोलि’च्या कर्मचाऱ्यांच्या संप काळात कोळशाचा पुरवठा बंद होता; परंतु संप मिटल्यानंतर ‘वेकोलि’कडून दररोज एक रॅक कोळसा पारस केंद्राला प्राप्त होत आहे. एका गाडीत ४ हजार टन कोळसा असतो. याचा अर्थ एक रॅक कोळसा एक संच कार्यान्वित ठेवण्यात खर्च होत असल्याचे वास्तव आहे. कोळसा ओला असल्याने संच कार्यान्वित ठेवण्यात अडचणी येत आहे. सध्या ताशी ६६ टन कोळसा जाळला जात असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
दुसरा संच सुरू झाल्यावर तुटवडा भासणार
देखभाल दुरुस्तीसाठी गत महिनाभरापासून बंद असलेला चार क्रमांकाचा संच येत्या ३ ते ४ दिवसांत सुरू होणार आहे. त्यामुळे औष्णिक केंद्रात असलेला कोळशाचा साठा अपुरा पडणार आहे.
कोळशाचा तुटवडा असला, तरी दररोज एक रॅक कोळसा प्राप्त होत असून, केंद्रात चार दिवस पुरेल एवढा साठा आहे. एक संच बंद असला, तरी शेड्युलनुसार वीजनिर्मिती सुरू आहे. - रवींद्र गोहणे, मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र, पारस