अकोला जिल्ह्यात चार दिवस शुन्य सावलीचा अनुभव
By Atul.jaiswal | Published: May 18, 2024 02:30 PM2024-05-18T14:30:52+5:302024-05-18T14:32:35+5:30
कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातील हे दोन दिवस शून्य सावलीचे असतात
अकोला : प्रकाश-सावलीची अतूट जोडी सदैव साथ देताना दिसते पण अपवादात्मक स्थितीत जेव्हा ही साथ सूटते तेंव्हा एखादी अनोखी घटना घटते. बुधवार २२ मे ते शनिवार २५ मे या चार दिवसांत संपूर्ण अकोला जिल्ह्यात दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी अचानक काही क्षणांसाठी आपली सावली नाहीशी झाल्याचा अनुभव घेता येणार आहे.
कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातील हे दोन दिवस शून्य सावलीचे असतात. ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. अकोलेकरांना गुरुवार, २३ मे रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी शून्य सावलीची अनुभूती घेता येणार आहे, असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी सांगितले.
कोणत्या दिवशी कोठे शुन्य सावली?
दिनांक : ठिकाण
२२ मे : पातुर,वाडेगाव,धाबा,महान, पिंजर
२३ मे : अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर
२४ मे : दहिहांडा, केळीवेळी,चोहोट्टा,अंदूरा
२५ मे : अकोट,सावरा,अडगाव, हिवरखेड
सर्वांनी या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा. केवळ आपण सरळ उभे राहिलो तरी आपली सावली काही क्षणापुरती दूर होईल. अशी स्थिती पुन्हा २०जुलै रोजी येईल. परंतु त्या वेळी आकाश अधिक ढगाळ असल्याने आताच्या संधीचा इच्छुकांनी लाभ घेतला पाहिजे.
प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला