मलेरिया विभागाचे चार कर्मचारी निलंबित
By admin | Published: April 12, 2017 02:17 AM2017-04-12T02:17:23+5:302017-04-12T02:17:23+5:30
कर्तव्यात कामचुकारपणा करणाऱ्या मलेरिया विभागातील चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी दिला.
अकोला: शहरात स्वाइन फ्लू आजाराने उग्र रूप धारण केल्यानंतरही कर्तव्यात कामचुकारपणा करणाऱ्या मलेरिया विभागातील चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी दिला. शहरात साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही अशाच प्रकारच्या कारवाईचा बडगा उगारला जाण्याचे संकेत आहेत.
शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्ल्यू आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. शहराच्या विविध भागात घाणीचे, केरकचऱ्याचे ढीग साचले असून, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. असे असले तरी मनपाचा वैद्यकीय आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, मलेरिया विभाग कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचे चित्र समोर आले. याप्रकाराची महापौर विजय अग्रवाल यांनी गंभीर दखल घेत मागील तीन दिवसांपासून मनपाच्या आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा इत्थंभूत आढावा घेतला. महापौर अग्रवाल यांनी १० एप्रिल रोजी दक्षिण झोनस्थित मनपाच्या संकुलमध्ये मलेरिया विभागाची आकस्मिक पाहणी केली असता ३२ कर्मचाऱ्यांपैकी १६ कर्मचारी गैरहजर आढळून आले होते. तर उर्वरित कर्मचारी उशिरा पोहोचले. तसेच मलेरिया विभागाच्या गोडावूनची पाहणी केली असता उपलब्ध औषधी साठा तसेच साठा पुस्तिकेच्या नोंदवहीत तफावत आढळून आली होती. यासंदर्भात महापौरांनी आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत चर्चा केली. मलेरिया विभागातील चार कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत असल्याचे लक्षात येताच आयुक्त लहाने यांनी सदर कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले.
शहरावर स्वाइन फ्लूचे सावट लक्षात घेता स्वच्छता व साफसफाईच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. वैद्यकीय आरोग्य यंत्रणा, स्वच्छता विभागासह मलेरिया विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. कर्तव्यात कसूर आढळल्यास कारवाई निश्चित आहे.
- अजय लहाने, आयुक्त, मनपा