चार शेतक-यांना जमीन परत मिळणार!
By admin | Published: January 10, 2017 02:32 AM2017-01-10T02:32:49+5:302017-01-10T02:32:49+5:30
सावकारांनी हडपलेल्या शेत जमिनी परत देण्याची सहायक निबंधकांची शिफारस.
अकोला, दि. ९-बाळपूर तालुक्यातील चार शेतकर्यांनी सावकारांनी शेतजमीन हडपल्याची तक्रार बाळापूरचे सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली होती. या प्रकरणात सहायक निबंधकांनी चारही शेतकर्यांना जमीन परत देण्याची शिफारस सावकारांच्या जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. हातरूण येथील कलंदर खा सिकंदर खा व एजाज खा कलंदर खा यांनी सुलेमान शहा तुराब शहा, मोसीन शहा लुकमान शहा व गजानन लक्ष्मणराव काळे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणी शेतकर्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून सावकारीत हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश बाळापूरच्या सावकारांच्या सहायक निबंधकांनी दिले आहेत. अंदुरा येथील दुर्गाबाई माणिकराव तायडे यांनी केशवराव भगत यांच्याविरुद्घ सावकारीत शेत हडपल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात दुर्गाबाई यांच्या नावाने खरेदी खत करण्याची शिफारत सावकारांच्या सहायक निबंधकांनी दिली आहे. अंदुरा येथीलच फुलचंद जयदेव पाटील यांनी केशव तुळशीदास भगत यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणात खरेदीखत रद्द करून अर्जदाराच्या नावाने जमीन करण्याची शिफारस सहायक निबंधकांनी केली आहे. निमकर्दा येथील गजानन भुलाजी इंगळे यांनी देवीदास उबाळे, सुनील जयंतराव बावस्कर, विजयकुमार मायाप्रसाद तिवारी व नगेंद्र प्रमोद पंचाली यांच्याविरुद्ध सावकारीची तक्रार केली होती. या प्रकरणातही जमीन शेतकर्यांना देण्याची शिफारस केली आहे.