अखेर ‘फोर-जी’चा घोळ चव्हाट्यावर; चक्क सहा केबल पाइपचे आढळले जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:14 PM2019-12-25T12:14:08+5:302019-12-25T12:14:29+5:30
मनपाच्या तपासणीत एक-दोन नव्हे, तर चक्क सहा केबल टाकण्याचे पाइप आढळून आले आहेत.
अकोला: महापालिकेच्या परवानगीला धाब्यावर बसवित शहराच्या कानाकोपऱ्यात फोर-जी केबलचे जाळे टाकणाºया स्टरलाइट टेक कंपनीसह इतर मोबाइल कंपन्यांनी केलेली बदमाशी चव्हाट्यावर आली आहे. ‘लोकमत’मधील वृत्त लक्षात घेता, मनपा प्रशासन कारवाईसाठी चालढकल करीत असल्याचे पाहून आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी खोदकामाची तपासणी करण्याचे निर्देश जारी केल्यावर मनपाच्या तपासणीत एक-दोन नव्हे, तर चक्क सहा केबल टाकण्याचे पाइप आढळून आले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहता मनपाच्यावतीने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीच्या व्यवस्थापकांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा तक्रार नोंदविण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरात २६ किलोमीटर अंतर फोर-जी केबलचे जाळे टाकण्यासाठी स्टरलाइट टेक कंपनीच्यावतीने मनपाकडे रीतसर परवानगी अर्ज सादर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी कंपनीला कोणतेही शुल्क आकारू नये, असे तत्कालीन भाजप सरकारचे निर्देश असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने ९ डिसेंबर २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मंजूर प्रस्तावानुसार कंपनीला केवळ एका पाइपद्वारे सिंगल केबल टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय. यादरम्यान, गत दीड ते दोन वर्षांपासून काही मोबाइल कंपन्यांच्यावतीने शहराच्या विविध भागात खोदकाम करून फोर-जी केबल टाकल्या जात असल्याने संबंधित कंपन्यांना मनपाने रीतसर परवानगी दिली का, असा प्रश्न उपस्थित झाला. मनपाने कोणत्याही मोबाइल कंपनीला परवानगी दिली नसल्याचे समोर आल्यानंतरही प्रशासन कारवाई करीत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरले. त्यामुळे नाइलाजाने का होईना, २३ डिसेंबर रोजी बांधकाम विभागाच्यावतीने शहरात अनधिकृतपणे खोदकाम करणाºया रिलायन्स जिओ कंपनीविरोधात तक्रार नोंदविण्यात आली, हे विशेष.
केबलसाठी सहा पाइप टाकले कसे?
बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाने अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर जेसीबीद्वारे खोदकाम करून फोर-जी केबलसाठी टाकण्यात आलेले तब्बल सहा पाइप शोधून काढले. यामध्ये स्टरलाइट टेक कंपनीला केवळ एका पाइपद्वारे सिंगल केबल टाकण्याची अनुमती असताना या कंपनीचे दोन पाइप आढळून आले. उर्वरित चार पाइप रिलायन्स जिओ कंपनीचे असल्याचा दावा मनपाने केला आहे. मनपाची परवानगी नसताना कंपन्यांनी सहा पाइप टाकले कसे, पाइप टाकताना प्रशासन झोपेत होते का, असे नानाविध सवाल उपस्थित झाले आहेत.
रिलायन्स विरोधात तक्रारी; कारवाई शून्य
मनपाच्या परवानगीला ठेंगा दाखवित शहरात खोदकाम करणाºया रिलायन्स जिओ कंपनीविरोधात प्रशासनाने २६ जून व २३ डिसेंबर २०१९ रोजी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या आहेत. २३ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतरही २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यालगत रिलायन्स कंपनीने ‘ओएफसी’ केबल टाकण्यासाठी पाच ‘पीव्हीसी’ पाइप टाकल्याची तक्रार मनपाने २४ डिसेंबर रोजी कोतवाली पोलिसांत दिली आहे. मनपाने तक्रारी केल्यावरही कंपनीविरोधात ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
पोलिसांनी करावा पंचनामा
फोर-जी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता मनपाने रिलायन्स कंपनीने टाकलेल्या पाइपचा पंचनामा करण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडे केली आहे. कंपनीच्या विरोधात वारंवार तक्रार दाखल केल्यावरही रात्री-अपरात्री केबल टाकण्याच्या प्रवृत्तीत वाढ होत असल्याने रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापक प्रयागदत्त मिश्रा व नरसिंग ठाकूर यांच्याविरोधात कारवाई करण्याचेही तक्रारीत नमूद आहे.
आमदारांना द्यावे लागले निर्देश
मनपात भाजपची एकहाती सत्ता आहे. गत आठ दिवसांपासून फोर-जी केबलचा मुद्दा ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतरही सत्तापक्षाचे पदाधिकारी मोबाइल कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देत नसल्याचे पाहून आमदार रणधीर सावरकर यांना समोर यावे लागले. मंगळवारी आ. सावरकर यांनी आयुक्त कापडणीस यांना सूचना दिल्यानंतर बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाने फोर-जी केबलसाठी टाकलेले पाइप शोधून काढले. ही बाब पाहता सत्ताधारी भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.
शहरात सर्वत्र फोर-जी केबलची कामे सुरू आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ घातला जात असल्याची दखल घेत मनपा आयुक्तांना तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. अपेक्षेप्रमाणे घोळ समोर आलाच. प्रशासनाने रोखठोक भूमिका न घेतल्यास जबाबदार अधिकाºयांची खैर नाही, हे नक्की.
-रणधीर सावरकर, आमदार.
मनपाच्या तपासणीत स्टरलाइट टेक व रिलायन्स जिओ कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कंपन्यांना काम बंद करण्याचा आदेश दिला असून, पाइप जप्त केले आहेत. येत्या गुरुवारी दोन्ही कंपनीच्या प्रतिनिधींना मनपात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.