तेल्हारा पं.स च्या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:18 AM2021-03-18T04:18:36+5:302021-03-18T04:18:36+5:30
तेल्हारा जि.प व पंचायत समितीमधील राजकीय आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द ...
तेल्हारा
जि.प व पंचायत समितीमधील राजकीय आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश आहेत.त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या १६ मार्च रोजी आलेल्या पत्रानुसार तेल्हारा पं स मधील चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले असून यामध्ये सभापती- उपसभापतींचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या प्रकरणावर ४ मार्च रोजी निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के नुसारच निश्चित करण्याचे जाहीर केले आहे.यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी ७ मार्च रोजी पत्र काढून जि.प च्या १४ तर पं.स च्या २४ जागा रिक्त ठरविल्या होत्या.यामध्ये तेल्हारा पं स चे राजकीय आरक्षण ५० टक्केच्या आत असल्याने येथील जागांवर गंडांतर नव्हते,मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या १६ मार्च रोजी आलेल्या पत्रानुसार ओबीसींच्या जागा या कमाल आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेत असो अथवा नसो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या रिक्त झाल्या आहेत असे आदेशात नमूद आहे.जागा रिक्त झाल्याच्या या निर्णयामुळे तेल्हारा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.गुरुवार १८ मार्च पर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील आयोगाने पत्रात दिल्या आहेत. दरम्यान सभापतीचा पदभार सिरसाट किंवा राठोड यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे
-------------
यांचे झाले सदयत्व रद्द! खा रफत सुल्ताना शाहिद खा सभापती भारिप,
प्रतिभा सतिष इंगळे उपसभापती काँग्रेस,
अरविंद मनोहर तीव्हाणे भारिप,
विलास चंद्रहास पाथ्रीकर भाजप
------------------