मूर्तिजापुरातील चौघांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 06:33 PM2020-06-05T18:33:37+5:302020-06-05T18:33:52+5:30
शहरातील तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना ५ जून रोजी उपजिल्हा रुग्णालातून सुटी देण्यात आली आहे.
मूर्तिजापूर : शहरातील तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना ५ जून रोजी उपजिल्हा रुग्णालातून सुटी देण्यात आली आहे. यापूर्वी हिरपूर येथील महिलेनेही कोरोनावर मात केल्याने तिला सुटी देण्यात आली होती.
मूर्तिजापूर शहरातील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांपैकी ६२ जणांना क्वारंटीन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पुनर्तपासणीत जवळच्या ३ नातेवाइकांचे अहवाल २७ मे रोजी पॉझिटिव्ह आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले असून, त्यांना शुक्रवारी तर हिरपूर येथील महिलेला चार दिवसांपूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यापूर्वी ६२ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते, तर हिरपूर येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, २५ मे रोजी २० लोकांचे स्वॅब घेऊन पाठविण्यात आले होते. त्यातील १२ लोकांचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. १२ पैकी ३ महिलांचा अहवाल २७ मे रोजी पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांना उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. २५ मे रोजी मृतकाच्या संपर्कातील १२ लोकांचे स्वॅब नमुने परत घेण्यात आले होते. त्यात इतर ८ लोकांच्या नमुन्यांचा समावेश होता. २७ मे रोजी संध्याकाळपर्यंत १४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, परत घेतलेल्या १२ नमुन्यातील तीन अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सदर पॉझिटिव्ह रुग्ण हे तीनही महिला असून, मृतक इसमाच्या जवळचे नातेवाईक आहेत. तेव्हापासून त्यांना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ ठेवण्यात आले होते. ५ मे रोजी ते तिन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला व कोकणवाडी भागातील एक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे यांनी ‘लोकमत’ला दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, निवासी नायब तहसीलदार आर. बी. डाबेराव, ठाणेदार शैलेश शेळके, डॉ. अभिजित मुरळ यांच्यासह रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होता. (शहर प्रतिनिधी)