दोन महिन्यांत चार हजार दंडात्मक कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:24 AM2020-12-30T04:24:52+5:302020-12-30T04:24:52+5:30
अकोला : प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून दोन महिन्यांत चार हजारांवर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली ...
अकोला : प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून दोन महिन्यांत चार हजारांवर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी रस्ते अपघातात शेकडो वाहनचालक मृत्युमुखी पडतात. रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांचे महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाने विश्लेषण केले असता, अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकांपैकी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, धोकादायकरीत्या वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन वळविणे किंवा चालविणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, ही प्रमुख कारणे समोर आली आहेत. त्याकरिता अपर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व वाहतूक शाखांना धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अकोला शहर वाहतूक शाखेने मागील २८ ऑक्टोबर २०२० पासून विशेष मोहीम सुरू केली होती. त्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्या ७७०, धोकादायकरीत्या वाहन चालविणाऱ्या ४५, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ७, चुकीच्या बाजूने वाहन वाळविणाऱ्या किंवा चालविणाऱ्या ९८, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या ८८०, चारचाकी चालविताना सीटबेल्ट न लावणाऱ्या १७५०, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ४५२ अशा एकूण ४००२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाया पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशाप्रमाणे शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदार यांनी केल्या. प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाहने चालवून अपघात टाळावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.