चारमोळीने पटकावला तालुक्यातून तिसरा क्रमांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:53 AM2017-08-17T01:53:32+5:302017-08-17T01:54:29+5:30

शिर्ला: पातूर तालुक्यातील डोंगरदर्‍यात वसलेल्या दुर्गम आदिवासीबहुल चारमोळी गावाने एक छदामही नसताना जिद्द चिकाटी आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर गावाचा दुष्काळ दूर करीत पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकाचे तालुकास्तरीय पारितोषिक पटकावले.

Fourth of the rank of number four! | चारमोळीने पटकावला तालुक्यातून तिसरा क्रमांक!

चारमोळीने पटकावला तालुक्यातून तिसरा क्रमांक!

Next
ठळक मुद्देआदिवासी गावाची पाणीदार कामगिरीनिराधारांनी दिले अनुदान अपेक्षेपेक्षा जास्त श्रमदान 

संतोषकुमार गवई । 
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला: पातूर तालुक्यातील डोंगरदर्‍यात वसलेल्या दुर्गम आदिवासीबहुल चारमोळी गावाने एक छदामही नसताना जिद्द चिकाटी आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर गावाचा दुष्काळ दूर करीत पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकाचे तालुकास्तरीय पारितोषिक पटकावले.
दळणवळणाची अपुरी साधने प्रगत समाजापासून कोसो दूर, अल्प शेती, पाण्याचा प्रचंड तुडवडा, विपरीत परिस्थितीत जीवन जगणारे केवळ ५३३ लोकसंख्या आणि ६७५ क्षेत्रफळाचे जिल्हा मुख्यालयापासून जवळपास १00 कि.मी. तर तालुक्याच्या सीमेवरील आदिवासीबहुल चारमोळी गावाला जेव्हा पाणी फाउंडेशनचे पातूर तालुका समन्वयक प्रफुल्ल कोल्हे आणि सुभाष नानोटे पोहचले तेव्हा कुणीतरी आपली स्व:तहून दखल घ्यायला आले, यावर प्रथमदर्शनी विश्‍वास बसला नाही; मात्र जेव्हा पाणी फाउंडेशनने गावातील ५ जणांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले तेव्हा गावचा दुष्काळ दूर होऊ शकतो, अशी आशा पल्लवित झाल्या. जलसंधारणातून गावाचा विकास होऊ शकते, ही बाब घरोघरी जाऊन प्रशिक्षण घेऊन आलेल्यांनी सुरुवात केली. १८ मार्चला टाळमृदंग वाजवत ५३३ गावकर्‍यांच्या सहभागाने शिवारफेरी काढली. शिवारफेरीत आबालवृद्ध सर्वच सहभागी झाले तर जलसंधारणासाठी परिसर पिंजून काढला. सिद्धार्थ कवले आणि गावकर्‍यांनी कामाचे नियोजन केले. ७८ वर्षीय यशवंत कवळे यांनी आयुष्यात पहिल्यांदाच गावाची एकजूट पाहिली आणि गावकर्‍यांनी सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेंतर्गत ८ मार्चला प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. 

निराधारांनी दिले अनुदान 
श्रमदानातून जलसंधारणाची कामे सुरूच होती; मात्र अचानक एक दिवस भारतीय जैन संघटनेने घोषित केले, स्पर्धेतील कामासाठी मशीन देणार अन् हा आनंद काही क्षणातच हवेत विरला. कारण संघटना मशीन मोफत देणार; मात्र डिझेलसाठी पैसे आणावे कुठून? ही बातमी पोहचली गावातील गौकर्णाबाईकडे. सदर महिलेने २0 वृद्धांना एकत्र केले. संजय गांधी निराधार योजनेच्या मिळणार्‍या ६00 रुपयातील ५00 रुपये डिझेलसाठी दिले; मात्र रक्कम तुटपुंजी होती. वृद्धांच्या दातृत्वाची बित्तंबातमी तालुक्यातील नागरिक, प्रशासनातील अधिकारी आणि आमदार बळीराम सिरस्कार यांच्यापर्यंत पोहोचली, सर्वांनी जमेल ती मदत दिली.

अपेक्षेपेक्षा जास्त श्रमदान 
श्रमदानाने ३३ हजार घनमीटरचे लक्ष्य होते; मात्र गावकर्‍यांच्या झपाटलेपणाने सुमारे १ लाख ४६ हजार घनमीटरचे लक्ष्य गाठले. स्पर्धेतील मूल्यांकनानुसार यंत्राद्वारे जलसंधारणाचे काम करायचे ध्येय डोळ्यासमोर होते; मात्र गावातील कोरडवाहू शेती, अत्यल्प उत्पन्न, रोजगारासाठी वणवण भटकावे लागण्याचे विदारक चित्र होते. त्यामुळे श्रमदानाने अनेक कामे करण्यात आली.   

आमिर खानने केले          होते कौतुक 
 दुर्गम चारमोळीची जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची माहिती पोहचली, पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सिनेअभिनेते आमिर खान आणि किरण राव यांच्यापर्यंत. त्यांनी विलंब न करता डोंगरदर्‍यातील चारमोळीला येण्यासाठी मुंबईहून विशेष विमानाने अकोला आणि तेथून थेट चारमोळी गाठले. गावाने जलसंधारणाचे केलेले काम आणि त्यासाठी केलेली जुळवाजुळव याची संपूर्ण माहिती घेऊन गावकर्‍यांचा उत्साह वाढवला. .

जलसंधारणावर खर्च करणार पुरस्काराची रक्कम 
सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक सुंदर ३१0 दगडी बांध घातले. सलग समतल चर खोदले, कंटुर बांध घातले, कपांर्टमेट बंडिंग केले. स्पर्धेतील श्रमादानातून जलसंधारणाची सर्वोत्कृष्ट कामाची विशेष फिल्म पाणी फाउंडेशनने बनविली आहे. तालुक्यातील तृतीय क्रमांक चारमोळीने पटकाविला असला तरी केलेला कामांचा दर्जा महाराष्ट्र राज्यात क्रमांक एकचा आहे. मिळालेली पुरस्काराची रक्कम गावकरी जलसंधारणाच्या विविध कामांवर खर्च करणार आहेत.
 

Web Title: Fourth of the rank of number four!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.