चार्टर्ड अकाउंटंट थावरणीसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 10:47 AM2020-11-16T10:47:41+5:302020-11-16T10:48:07+5:30
Akola Crime News दस्तावेजांचे व धनादेशाचा गैरवापर करून हाडोळे यांची फसवणूक केली.
अकोला: जिल्ह्यातील वाडेगाव व शेगाव येथील कृषी केंद्र तसेच पेट्रोलपंपधारक व त्यांच्या पत्नीच्या धनादेश, व्यवहाराचे कागदपत्रे व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट विनय थावराणी व त्याचा साथीदार शर्मा या दोघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडेगाव येथील गोपाल चंद्रभान हाडोळे (४७) यांचे वाडेगाव व शेगाव येथे कृषी केंद्र व पेट्रोल पंप आहे. यामध्ये आरोपी चार्टर्ड अकाउंटंट विनय बालमुकुंद थावराणी (४२) वर्ष रा. आदर्श कॉलनी खदान हे ऑडिट व अकाउंटिंगचे काम पाहतात. त्यांच्या परिचयाचे चार्टर्ड अकाउंटंट यशपाल दयाराम शर्मा रा. बोरगाव मंजू आहेत. या दोघांनी हाडोळे यांच्यासोबत व्यवहार दाखवून त्यांच्या दस्तावेजांचे व धनादेशाचा गैरवापर करून हाडोळे यांची फसवणूक केली. हा प्रकार तक्रार करते हाडोळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणात आरोपीविरोधात भादंविच्या कलम ४०६, ४१५, ४२०, ४६५, ४६८, ४७१ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी खदान पोलीस अधिक तपास करीत आहेत.