दिल्लीच्या ठगांकडून शिक्षण संस्थाचालिकेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:20 AM2020-12-06T04:20:20+5:302020-12-06T04:20:20+5:30
नागपूर : राष्ट्रीय हरित क्रांती प्राधिकरणाकडून प्रतिबंधित असलेल्या जागेवर शाळेची बहुमजली इमारत उभी करून देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगांनी ...
नागपूर : राष्ट्रीय हरित क्रांती प्राधिकरणाकडून प्रतिबंधित असलेल्या जागेवर शाळेची बहुमजली इमारत उभी करून देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगांनी येथील एका शिक्षण संस्थेच्या संचालिकेचे ५० लाख रुपये हडपले. फरिद आरिफउद्दीन (वय ५७, रा. ईस्ट कैलास न्यू दिल्ली) आणि शेख कमलुद्दीन मोहम्मद असगर (रा. ६५, जामियानगर, न्यू दिल्ली) अशी या ठगांची नावे आहेत.
सबा अथर अब्बू बकर (वय ४३, रा. जाफरनगर) यांना दिल्लीत शाळा सुरू करण्यासाठी जागा हवी होती. त्यामुळे त्या संपर्कातील व्यक्तीकडे चौकशी करीत होते. २६ डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना आरोपी आरिफउद्दीन आणि कमलुद्दीन या दोघांनी गाठले. त्यांना या दोघांनी एक जागा दाखविली. तेथे शाळेची बहुमजली इमारत उभी करून देण्याची तयारीवजा थाप या दोघांनी मारली. जागेचा सौदा केल्यानंतर आरोपींनी सबा यांच्याकडून प्रारंभी ५१ हजार ५०० रुपयाचे टोकन घेतले. नागपुरात येऊन काही कागदपत्रे दाखविली. त्यानंतर गीतांजली टॉकीजजवळ निराला स्कूल कॉम्प्लेक्समध्ये सबा यांच्यासोबत चर्चा करून काम सुरू करण्यासाठी त्यांना ५० लाख रुपये मागितले. सबा यांनी आरोपींच्या खात्यात ५० लाख रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर मात्र आरोपींनी सबा यांना टाळणे सुरू केले. त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सबा यांनी दिल्लीत आरोपींनी दाखविलेल्या जागेची शहानिशा केली असता, राष्ट्रीय हरित क्रांती प्राधिकरणाकडून त्या जागेवर बांधकाम करण्यास मनाई असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी प्रतिसाद देत नसल्याने आणि त्यांनी संगनमत करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने, सबा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी करून या प्रकरणात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.