नंबरप्लेटची हेराफेरी, ट्रान्सपोर्ट संचालकाला आरटीओकडून दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:36+5:302021-05-05T04:29:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील विजय ट्रान्सपोर्ट संचालकाच्या मालकीच्या असलेल्या दोन ट्रकचा क्रमांक सारखाच असल्याची तर तिसऱ्या ट्रकच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील विजय ट्रान्सपोर्ट संचालकाच्या मालकीच्या असलेल्या दोन ट्रकचा क्रमांक सारखाच असल्याची तर तिसऱ्या ट्रकच्या क्रमांकात हेराफेरी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रान्सपोर्टच्या संचालकाला दंड ठोठावला आहे.
विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल आसिफ अब्दुल कदीर यांची स्थानिक गुन्हे शाखेकडून काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली. त्यांच्या मालकीचे तीन ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता, यामधील दोन ट्रकचा क्रमांक एकच असल्याचे तर तिसऱ्या ट्रकचा क्रमांक मिटवण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे एकाच क्रमांकावरून तीन ट्रकमधून मालाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरुन ट्रक ताब्यात घेऊन संचालकांची चौकशी करण्यात येत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनाही याची माहिती देण्यात आली असून, ट्रकचा चेसिस क्रमांक तसेच वाहतूक परवाना व इतर सर्व तांत्रिक मुद्द्यांची तपासणी केल्यानंतर ट्रकच्या नंबरप्लेटमध्ये हेराफेरी केल्याचे समोर आले. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने विजय ट्रान्सपोर्ट संचालकांना नंबरप्लेटमध्ये हेराफेरी केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल आसिफ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गृहमंत्र्यांचे नावे दहा लाखांचा हप्ता मागितल्याचा तसेच त्यांच्यापासून जीवाला धोका असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखेने विजय ट्रान्सपोर्टच्या तीन ट्रकमधील एक ट्रक हा चोरीचा असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती दिली. तसेच दोन ट्रकचे एकच क्रमांक ठेवून मोठा कर बुडविण्यात येत असल्याच्या कारणावरून हे ट्रक ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पोलीस व विजय ट्रान्सपोर्ट संचालकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या प्रकरणाची चौकशी गृह विभागाचे उपअधीक्षक नितीन शिंदे करत असून, त्यांच्या चौकशीनंतरच सत्य समोर येणार आहे.
विजय ट्रान्सपोर्टच्या संचालकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्या वाहनचालकांनी या संदर्भात सविस्तर जबाब त्याचदिवशी व त्याचवेळेस स्थानिक गुन्हे शाखेला दिलेला आहे. या ट्रान्सपोर्टच्या संचालकाने यापूर्वी मूर्तिजापूर येथील तहसीलदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर गाडी नेवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यासह बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती चोरीचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल आहे. त्यामुळे स्वतःवरील कारवाई वाचविण्यासाठीच ते आरोप करत आहेत.
- शैलेश सपकाळ
स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख
स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गृहमंत्र्यांच्या नावावर १० लाख रुपयांचा हप्ता मागितला. तो न दिल्याने कारवाई करण्यात येत आहे. तसेच जबाब घेण्यासाठी कार्यालयात बोलावून दबाव टाकूनही तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलीस एन्काऊंटर करतील, याचीही भीती आहे. त्यामुळे जबाब रजिस्टर्ड पोस्टाद्वारे पाठविण्यात आला आहे, असे विजय ट्रान्सपोर्ट संचालकांनी स्पष्ट केले.