रंभापूर पाणी पुरवठा योजनेत ३.६० लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:57 PM2018-09-18T13:57:27+5:302018-09-18T13:59:53+5:30
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कोट्यवधींचा निधी घेऊन कामे पूर्ण न करणाºया जिल्ह्यातील ६९ गावांतील ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांच्या पदाधिकाºयांवर आता फौजदारी कारवाईची तयारी सुरू झाली आहे
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कोट्यवधींचा निधी घेऊन कामे पूर्ण न करणाºया जिल्ह्यातील ६९ गावांतील ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांच्या पदाधिकाºयांवर आता फौजदारी कारवाईची तयारी सुरू झाली आहे. दोन योजनेच्या पदाधिकाºयांवर फौजदारीच्या तक्रारीनंतर आता मूर्तिजापूर तालुक्यातील रंभापूर योजना राबविणाºया पदाधिकाºयांवर फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून रंभापूर पाणी पुरवठा योजनेसाठी फेब्रुवारी २०१३ मध्ये निधीला मंजुरी देण्यात आली. ग्राम पाणी पुरवठा समितीने कामे पूर्ण केली नाहीत. काम पूर्ण नसल्याने त्याबाबत पाणी पुरवठा विभागाने सातत्याने त्याबाबत समितीला कळविले, तरीही समितीने काम पूर्ण केले नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने १९ मे २०१८ रोजी समिती अध्यक्ष, सचिवांंना पत्र देत मूल्यांकनानुसार अपहार झालेली रक्कम ३ लाख ६० हजार ४१२ रुपये शासनजमा करण्याचे बजावले. त्या पत्रालाही समितीने दाद दिली नाही. त्यामुळे २८ जून २०१८ रोजी गटविकास अधिकारी मूर्तिजापूर यांना पत्र देत समितीच्या पदाधिकाºयांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच रक्कम वसुलीही करावी, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतरही कारवाई न झाल्याने पाणी पुरवठा विभागाने ११ जुलै २०१८ रोजी अंतिम नोटीस दिली. तरीही समितीने अपहाराची रक्कम जमा केली नाही. त्यामुळे समितीवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश मूर्तिजापूर गटविकास अधिकाºयांना देण्यात आले आहेत. त्याची तक्रारही गटविकास अधिकाºयांनी अद्यापपर्यंत केलेली नाही, हे विशेष.