तूर विक्रीत फसवणूक; दोन व्यापाऱ्यांना अटक
By admin | Published: June 29, 2017 12:58 AM2017-06-29T00:58:05+5:302017-06-29T00:58:05+5:30
नाफेडला एकाच सात-बारावर तूर विकून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार तेल्हारा येथील सहायक उपनिबंधक राजुसिंग राठोड यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : नाफेडच्यावतीने केलेल्या तूर खरेदीत हिवरखेड येथील व्यापारी व अडत्यांनी अकोट व तेल्हारा येथे नाफेडला एकाच सात-बारावर तूर विकून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार तेल्हारा येथील सहायक उपनिबंधक राजुसिंग राठोड यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली. या पोलिसांनी याप्रकरणात तीन व्यापाऱ्यांविरुद्ध भादंविच्या ४२० व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन व्यापाऱ्यांना अटक केली आहे.
नाफेडच्या तूर खरेदी झालेल्या गैरप्रकाराची शासनाने चौकशी सुरू केली. या चौकशीत हिवरखेड येथील व्यापारी सुनील चिरंजीलाल बजाज व प्रदीप चिरंजीलाल बजाज या दोन भावांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची फसवणूक करून एकाच सात-बारावर तेल्हारा व अकोट येथे ३०० क्विंटलच्या जवळपास तूर विकल्याचे निष्पन्न झाले, तसेच हिवरखेड येथीलच गोपाल चांडक यांनीही नाफेडला तूर विकण्याप्रकरणी शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेल्हारा येथील सहायक उपनिबंधक राजुसिंग राठोड यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये उपरोक्त तिन्ही व्यापाऱ्यांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून याप्रकरणी प्रदीप बजाज व सुनील बजाज या दोन्ही आरोपींना तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणपत गवळी, पीएसआय नागोराव भांगे यांनी अटक केली. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत. याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांना अटक झाल्याने आता नाफेडला तूर विकणाऱ्या अजून काही व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.