नामांकित कंपनीच्या नावांवर बक्षीस योजना देणाऱ्या बोगस साईटचा सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 11:02 PM2018-05-24T23:02:02+5:302018-05-24T23:02:02+5:30
नामांकित कंपनींच्या नावाखाली बक्षीस योजनांचे आमिष दाखविणा-या बोगस साईटचा सुळसुळाट झाला आहे. बक्षीस योजनांच्या मॅसेजचे जाळे व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून टाकण्याचे प्रयोग सुरू असून, यातून भविष्यात फसवणूक होण्याचे संकेत आहेत.
- संजय खांडेकर
अकोला - नामांकित कंपनींच्या नावाखाली बक्षीस योजनांचे आमिष दाखविणा-या बोगस साईटचा सुळसुळाट झाला आहे. बक्षीस योजनांच्या मॅसेजचे जाळे व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून टाकण्याचे प्रयोग सुरू असून, यातून भविष्यात फसवणूक होण्याचे संकेत आहेत.
स्पोर्ट साहित्य निर्मितीच्या जागतिक दर्जाच्या एका कंपनीचा अमुक-टमुक वर्धापन दिन असून, त्या निमित्ताने कंपनी शंभर भाग्यवंत ग्राहकांना शूज भेट देणार आहे, असे आमिष दाखविणारे मॅसेज गेल्या दोन आठवड्यापूर्वी व्हाट्स अॅपवर व्हायरल झाले. व्हायरल मॅसेजमधील सूचनेनुसार प्रयोग केल्यानंतर ही फेक साईट असल्याचे समोर आले. या घटनेला काही दिवस होत नाही तोच दोन दिवसांपासून एका बहुचर्चित खासगी विमान कंपनीच्या नावाखाली तशाच प्रकारच्या बक्षीस योजनेचा मॅसेज व्हाट्स अॅपवर व्हायरल होत आहे. ज्याप्रमाणे स्पोर्ट साहित्याची साईट फेक निघाली त्याचप्रमाणे या विमान कंपनीची साईटही फेक निघाली आहे. जाळ््यात ओढण्यासाठी विदेशातील लाभार्थ्यांच्या बनावट लालची कॉमेंटसही येथे टाकलेल्या असतात. त्यामुळे क्लीक करताच हजारो मोबाइल क्रमांकांचा डेटा अज्ञात साईटवर नोंदविला जातो. ज्याचा कुणाशी परिचयदेखील नाही. गोळा झालेल्या डेटाचा कोठे वापर तर होत नसेल ना, अशी शंका उपस्थित होते. सायबर क्राइमचा कारोभार पाहणाºया गुन्हे शाखेच्या अधिकाºयांसाठी हा विषय संशोधनाचा ठरतो आहे.
बॉक्स *असे ठगविल्या जाते....
व्हाट्स अॅपवर बक्षीस योजनेचा मॅसेज येऊन पडतो. या मॅसेजच्या माध्यमातून कंपनीची एक लिंक दिली जाते. क्लीक करताच संबंधित साईट उघडली जाते. नंतर साईटवर काही प्रश्न विचारून जुजबी माहिती टिपली जाते. त्यानंतर भाग्यवंत घोषित करून तुमचे मत मागितले जाते. एवढे सारे झाल्यानंतर सदर आमिषचा मॅसेज १० ते २० व्हाट्स अॅप ग्रुपवर किंवा व्यक्तींना पाठविण्याची सूचना दिली जाते. म्हणजे तुमच्यासह आणखी १०-२० जण त्यामध्ये जोडले जातात आणि एकाच वेळी हजारो मोबाइल क्रमांकाची माहिती अज्ञात असलेल्या साईटवर नोंद होते. साईटवरील सूचनेचे पालन केल्यानंतर शूजची साईज, विमान प्रवासाची तारीख टाकण्याच्या सूचना दिल्या जातात आणि पुढे अचानक ही साईट निकामी (बंद) होते.