बनावट दस्तावेज बनविणा-या १५ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे

By admin | Published: January 30, 2016 02:24 AM2016-01-30T02:24:32+5:302016-01-30T02:24:32+5:30

मजूर सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचा समावेश

Fraudulent crimes against 15 people making fake documents | बनावट दस्तावेज बनविणा-या १५ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे

बनावट दस्तावेज बनविणा-या १५ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे

Next

अकोला: अकोला जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्षपद तसेच सभासदपद मिळविण्यासाठी चक्क तहसीलदारांची स्वाक्षरी व शिक्क्यांसह तहसील कार्यालयातील विविध दस्तावेज बनावट तयार करणार्‍या १५ जणांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मजूर सहकारी संस्थेचा अध्यक्ष विठ्ठल पाटील याच्यासह १५ जणांचा समावेश आहे. अकोला जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच सभासदपद मिळण्यासाठी संबंधित व्यक्ती ही शारीरिक श्रम करणारी तसेच या श्रमातून मिळणार्‍या उत्पन्नातून स्वत:ची उपजीविका भागविणारी असणे बंधनकारक आहे. अशा प्रकारचा शासनाचा आदेशही असताना अकोला जिल्हा सहकारी संस्थेचा अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी अकोला तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे व शिक्क्यांचे खोटे व बनावट दस्तावेज तयार केले. त्यानंतर या बनावट दस्तावेजाच्या आधारे अकोला जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्षपद बळकावले. विठ्ठल पाटील याच्या प्रमाणपत्रावर संजय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षला संशय आल्याने त्यांनी या प्रमाणपत्राची तहसील कार्यालयात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागविली असता सदरचे प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयाने दिलेच नसल्याचे समोर आले. तसेच हे प्रमाणपत्र बनावट व खोटे असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली; मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली; मात्र पोलीस अधीक्षकांनीही लक्ष न दिल्याने तक्रारकर्त्याने न्यायालयात धाव घेतली. यावरून प्रथम श्रेणी न्यायालयाने बनावट दस्तावेज तयार करणार्‍या विठ्ठल पाटीलसह १५ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी विठ्ठल अशोक पाटील, सूर्यकांत राकेश, महेश शुक्ल, महेंद्र डवले, द्रौपदाबाई मावळे, दत्तात्रय मावळे, कैलास ठाकरे, मधुकर बेलसरे, माला शुक्ला, संजय तांबे, रेखा राकेश, सुनंदा तांबे, रमेश घाटे, सागर टेकाडे व सचिन टेकाडे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने अँड. संजय अटल, अँड. संजोग अटल व अँड. पीयूष अटल यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Fraudulent crimes against 15 people making fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.