मोफत प्रवेशाच्या जागा १९४६, अर्जांचा आकडा गेला २९७६ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:53 AM2023-03-09T11:53:30+5:302023-03-09T11:57:07+5:30

आरटीई प्रवेश प्रक्रियेला उदंड प्रतिसाद : अंतीम सोडतीत होणार अनेकांचा हिरमोड

Free admission seats 1946, number of applications went up to 2976 | मोफत प्रवेशाच्या जागा १९४६, अर्जांचा आकडा गेला २९७६ वर

मोफत प्रवेशाच्या जागा १९४६, अर्जांचा आकडा गेला २९७६ वर

googlenewsNext

अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून, राखीव असलेल्या एकूण १९४६ जागांसाठी गुरुवार, ९ मार्चपर्यंत २९७६  पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले. अर्ज करण्यासाठी असलेल्या १७ मार्च या अंतीम मुदतीपर्यंत अर्जांचा आकडा आणखी वाढणार असल्याने प्रत्यक्ष सोडतीत अनेकांचा हिरमोड होणार हे निश्चित आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी खासगी, विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटकाअंतर्गत ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती-धर्मातील विकलांग बालके आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी पात्र आहेत. यावर्षी जिल्ह्यातील १९० शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केलेली असून, या शाळांमध्ये १९४६ जाग राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी पालकांना १ ते १७ मार्च या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत. बुधवार, १ मार्च रोजी आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होताच गत अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालकांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

केजीसाठी केवळ २९ जागा
जिल्ह्यातील १९० शाळांनी इयत्ता पहिलीसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. मात्र, ‘केजी’च्या वर्गांसाठी जागा आरक्षित ठेवण्याकडे बहुतांश शाळांनी पाठ केल्याचे चित्र आहे. केजी प्रवेशासाठी अकोला शहरातील केवळ दोन शाळांनी २९ जागा राखीव ठेवल्याचे आरटीई पोर्टलवर दिसते.

संकेतस्थळाची गती मंदावली
आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पालकांची मोठी झुंबड उडत आहे. त्यामुळे आरटीई संकेतस्थळाची गती मंदावत असल्याच्या तक्रारी येत आहे. अर्ज भरताना संकेतस्थळ हँग होत असल्याने एक अर्ज भरण्यासाठी पालकांना खूप वेळ लागत आहे.

Web Title: Free admission seats 1946, number of applications went up to 2976

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.