अकोला-वाशिमच्या दुष्काळग्रस्त भागातील ७६४९ विद्यार्थ्यांना मिळतेय मोफत बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:11 PM2019-03-16T13:11:46+5:302019-03-16T13:11:52+5:30
अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागातील ७६४९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत बससेवा दिली जात आहे. ही आकडेवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने दिली असून, शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंतही आकडेवारी कमी-जास्त होत आहे.
अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागातील ७६४९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत बससेवा दिली जात आहे. ही आकडेवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने दिली असून, शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंतही आकडेवारी कमी-जास्त होत आहे.
पुरेसा पाऊस न पडल्याने राज्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली. वेगवेगळ्या मदतीसोबतच राज्याच्या परिवहन महामंडळाने दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा करण्याची घोषणा केली. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर अकोला एसटी विभागाने ही सेवा सुरू केली. अकोला-वाशिम जिल्ह्यातील अकोला आगार क्र. १- १८३६, अकोला आगार क्रं. २- १७५०, अकोट आगार ३०३, कारंजा- ८०, मंगरूळपीर- ३७, वाशिम- २८६, रिसोड- १०६३, तेल्हारा- १३८५, मूर्तिजापूर- ९०९ विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून ही सेवा दिली जात आहे. अकोला आगार क्रमांक एकमधून सर्वात जास्त विद्यार्थी लाभ घेत असून, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील सर्वात कमी म्हणजे केवळ ३७ विद्यार्थी लाभ घेत आहेत. दहावी, बारावी सोबतच आयटीआय, महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना बोनाफाइड प्रमाणपत्र आणल्यानंतर फ्री पासेसची सेवा अकोला एसटी मंडळाने दिली.
- अकोला-वाशिममधील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या या महिन्यात ७६४९ दिसत असली, तरी ती संख्या दर महिन्यात बदलत राहते. अनेक परीक्षांचा कालावधी संपुष्टात येत आहे तर काही नवीन विद्यार्थी दाखल होत आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थी संख्येच्या आकडेवारीवर होत असतो.
-चेतना खिरवाडकर, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग अकोला.